Ticker

6/recent/ticker-posts

महिलांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य; वनमाला पेढारकर यांना राज्यस्तरीय ‘महिला गौरव पुरस्कार’


मंगरुळपीर (जि. वाशिम) : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कल्याण व सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये मंगरुळपीर येथील श्रीमती वनमाला परसराम पेढारकर यांची ‘राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार’ासाठी निवड करण्यात आल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे.

महिलाविषयक प्रश्नांवर सातत्याने व प्रभावीपणे काम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर केला आहे. सामाजिक क्षेत्रात महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी तसेच विविध प्रश्नांवर त्यांनी केलेले योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी पत्राद्वारे माहिती देत, पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा 7 मार्च 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे स्थळ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रवींद्र नाट्यगृह), प्रभादेवी, मुंबई येथे निश्चित करण्यात आले आहे.

 सकाळी 8:30 वाजता नोंदणी विभागात उपस्थित राहून आपली उपस्थिती नोंदवणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय प्रवासखर्च व इतर अनुषंगिक खर्चासाठी रु. 5000/-  इतकी रक्कम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामार्फत अदा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या राज्यस्तरीय सन्मानामुळे मंगरुळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर गौरवले जाणार असून, वनमाला पेढारकर यांच्या कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments