Ticker

6/recent/ticker-posts

लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचा गौरवशाली प्रवास; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची सदिच्छा भेट

प्रतिनिधी : श्रावणी कामत

मुंबई : त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री, तेलंगणाचे माजी राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल सन्मानीय श्री जिष्णू देव वर्मा यांची नुकतीच मुंबईतील लोकभवन येथे लोणावळ्यातील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री सुबोध तिवारी यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान श्री तिवारी यांनी राज्यपालांना कैवल्यधाम योग संस्थेचे विशेष कॉफी टेबल बुक भेट देऊन सन्मानित केले व त्यांना आगामी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या स्नेहपूर्ण भेटीत योग, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रसाराबाबत सकारात्मक चर्चा झाली.
कैवल्यधाम योग संस्थेच्या कार्याचा गौरव करताना, संस्थेच्या शतकोत्तर वाटचालीचा विशेष उल्लेख करण्यात आला. नुकतीच 100 वर्षे पूर्ण केलेल्या या संस्थेने योगशास्त्राच्या प्रसारात देश-विदेशात मोलाची भूमिका बजावली असून, आजही ती यशस्वीपणे पुढे वाटचाल करत आहे.
दरम्यान, कैवल्यधाम संस्थेअंतर्गत कार्यरत असलेले गोवर्धनदास सक्सेरिया योग महाविद्यालय यंदा आपले ‘प्लॅटिनम जुबिली’ वर्ष (75 वर्षे) साजरे करणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी श्री सुबोध तिवारी यांनी राज्यपाल श्री जिष्णू देव वर्मा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.
योग, परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधत कैवल्यधाम योग संस्था देशाच्या सांस्कृतिक वारशाला नवी दिशा देत असल्याचे या भेटीत अधोरेखित झाले.

Post a Comment

0 Comments