अमरावती, प्रतिनिधी अनिता यादव : शहरातील कला क्षेत्राला चालना देण्यासाठी G H Raisoni University ने पुढाकार घेत थीम बेस पेंटिंग स्पर्धेचे आयोजन केले आहे. बालचित्रकारांपासून ते व्यावसायिक कलाकारांपर्यंत सर्वांसाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेला 3 मेपासून सुरुवात होणार असून मे महिन्यातील प्रत्येक रविवारी विद्यापीठ परिसरात ही रंगतदार स्पर्धा रंगणार आहे.
अंजनगाव बारी रोडवरील विद्यापीठात सकाळी 8.30 वाजता होणाऱ्या पहिल्या स्पर्धेची थीम ‘दैनंदिन जीवनात वारली’ अशी निश्चित करण्यात आली आहे. या उपक्रमामागे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना असून स्थानिक कलाकारांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी सांगितले.
स्पर्धेत 8 वर्षांवरील सर्व हौशी, नवोदित आणि व्यावसायिक चित्रकार सहभागी होऊ शकतात. सहभागासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक असून विविध वयोगटांनुसार आकर्षक रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. 8 ते 13 वर्षे, 14 ते 21 वर्षे आणि 21 वर्षांवरील गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांसह उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेची थीम ‘दैनंदिन जीवन आणि परिसर’ तसेच ‘हरित अमरावती, स्वच्छ अमरावती’ अशी असून स्पर्धकांनी वारली, मधुबनी, गोंड, पट्टचित्र, कलमकारी या पारंपरिक कला शैलीत चित्र सादर करणे अपेक्षित आहे. सर्व स्पर्धकांना ड्रॉइंग पेपर विद्यापीठाकडून उपलब्ध करून दिला जाणार असून इतर साहित्य स्वतः आणावे लागणार आहे.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार असून या उपक्रमामुळे अमरावतीतील कला क्षेत्राला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धेचे संयोजक डॉ. अमर मोरे व कौसर अन्सारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments