Ticker

6/recent/ticker-posts

अकोटच्या मातीतून उभा राहिला ‘स्मार्ट मनी’चा शिलेदार!‘प्रसाद कॉलिंग इन्व्हेस्टमेंट’चे संस्थापक प्रसाद विजय गान यांना ‘ABP माझा अनमोल रत्न पुरस्कार’ प्रदान


उद्योगमंत्री उदय सामंत आणि अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते गौरव; मराठी तरुणांना आर्थिक स्वावलंबनाचा नवा मंत्र

मुंबई | विशेष प्रतिनिधी अनुप गोरे

जिद्द, परिश्रम आणि ध्येयवेड्या वृत्तीच्या जोरावर अकोला जिल्ह्यातील छोट्याशा अकोट शहरातून सुरू झालेला एक तरुण आज महाराष्ट्रातील हजारो युवकांच्या आर्थिक परिवर्तनाचा चेहरा बनला आहे. शेअर बाजार क्षेत्रात मराठी तरुणांना योग्य मार्गदर्शन, आर्थिक शिक्षण आणि स्वावलंबनाचा मार्ग दाखवणाऱ्या ‘प्रसाद कॉलिंग इन्व्हेस्टमेंट’चे संस्थापक तथा मार्गदर्शक प्रसाद विजय गान यांना प्रतिष्ठेचा ‘ABP माझा अनमोल रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत यांच्या शुभहस्ते त्यांना हा बहुमानाचा ‘बिझनेस अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे उद्योग, वित्त आणि शैक्षणिक क्षेत्रातून प्रसाद गान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संघर्षातून घडलेला यशस्वी प्रवास

अत्यंत सामान्य आणि बेताच्या कौटुंबिक परिस्थितीतून आलेल्या प्रसाद गान यांनी कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना केवळ आत्मविश्वास, अभ्यास आणि अथक मेहनतीच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अकोटसारख्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या स्पर्धात्मक शहरात येत त्यांनी शून्यातून स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि आज हजारो तरुणांच्या करिअरचा आधारस्तंभ बनले आहेत.

गेल्या चार ते पाच वर्षांत भारतीय शेअर बाजार क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. “मराठी माणूस हा फक्त नोकरी करणारा नाही, तर नोकरी देणारा झाला पाहिजे,” या ध्येयाने प्रेरित होऊन ते सातत्याने काम करत आहेत.

‘स्मार्ट मनी’च्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्याचा मंत्र

‘प्रसाद कॉलिंग इन्व्हेस्टमेंट’च्या माध्यमातून प्रसाद गान यांनी हजारो युवक-युवतींना शेअर बाजाराचे सखोल आणि दर्जेदार प्रशिक्षण दिले आहे. फक्त ट्रेडिंग शिकवणे एवढ्यापुरते त्यांचे काम मर्यादित नसून, आर्थिक शिस्त, गुंतवणूक व्यवस्थापन आणि फायनान्शियल फ्रीडमचा विचार तरुणांमध्ये रुजवण्याचे कार्य ते करत आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे आर्थिक पाय भक्कम केले आहेत. काहींनी स्वतःच्या इन्स्टिट्यूट सुरू करून इतर युवकांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ‘प्रसाद कॉलिंग इन्व्हेस्टमेंट’ ही संस्था आज केवळ प्रशिक्षण केंद्र न राहता आर्थिक परिवर्तनाची चळवळ बनत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मराठी तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस आणि त्यासाठी लढण्याची प्रेरणा प्रसाद गान यांच्या यशोगाथेतून मिळत आहे. मराठी तरुणांनी शेअर बाजार, गुंतवणूक आणि उद्योजकता यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पुढे यावे, यासाठी ते सातत्याने जनजागृती करत आहेत.

त्यांना मिळालेला ‘ABP माझा अनमोल रत्न पुरस्कार’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, मराठी युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या त्यांच्या ध्यासाला मिळालेली मोठी पावती मानली जात आहे.

महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव

या पुरस्कारानंतर उद्योग क्षेत्र, सामाजिक क्षेत्र तसेच विविध शैक्षणिक संस्थांकडून प्रसाद गान यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. “ग्रामीण भागातून आलेला एक तरुण आज हजारो कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्य करत आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रसाद गान यांच्या या यशामुळे अकोटसह संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण असून, युवकांमध्ये नव्या उमेदीची लाट निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments