Ticker

6/recent/ticker-posts

देशव्यापी औषध विक्रेता बंदचा फटका सर्वसामान्यांना?


जीवनावश्यक सेवा ठप्प होण्याची भीती; प्रशासनाने तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा — मंगरुळपीर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची मागणी

मंगरुळपीर  : सुधाकर चौधरी
अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाच्या वतीने दिनांक 20 मे 2026 रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदमध्ये मंगरुळपीर तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंगरुळपीर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा व सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे औषधे ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणारी बाब असून आजपर्यंत अत्यंत गंभीर परिस्थितीतही मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ क्वचितच आली नव्हती. कोरोना महामारीसारख्या संकटकाळातही औषध विक्रेत्यांनी जीव धोक्यात घालून नागरिकांना सेवा दिली होती. मात्र विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अखेर औषध विक्रेत्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

या बंदमुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, आपत्कालीन रुग्णसेवा घेणारे नागरिक तसेच नियमित औषधांवर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “जनसामान्यांचे जीवन विस्कळीत होणार नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, बंद दरम्यान तातडीच्या सेवेसाठी काही प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून अत्यावश्यक परिस्थितीत नागरिकांना मदत केली जाणार आहे.

तातडीच्या सेवेसाठी संपर्क क्रमांक :

  • श्री गोपाल ठाकरे — 9850492416
  • श्री नितीन हरणे — 8856031286
  • श्री सचीन बंग — 9423374626
  • श्री शिरीष बाहेती — 9881142085
  • श्री कैलास जाजू, रोडबाजार — 8888119415

तरीही प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून औषध विक्रेत्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी औषध विक्रेता संघटनांकडून करण्यात येत आहे.

औषध विक्रेते हे केवळ व्यवसायिक नसून आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, मंगरुळपीर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले असून मागण्यांचा पाठपुरावा शासन स्तरावर करण्याची विनंती करण्यात आली आहे. आता प्रशासन या गंभीर विषयावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments