श्रावणी कामत प्रतिनिधी
मावळ : श्री विठ्ठल परिवार मावळ व सकल दिंडी नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “बाल वारकरी प्रशिक्षण शिबिराला” यंदाही बाल वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या संकल्पनेतून गेल्या सहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, बालकांमध्ये संस्कारांची जपणूक व्हावी आणि मोबाईलच्या वाढत्या व्यसनापासून त्यांना दूर ठेवावे, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे.
जांभुळ येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेल्या या निवासी शिबिरात पहाटेपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. योगा, गीता पाठ, हरिपाठ, मृदूंग व हार्मोनियम प्रशिक्षणाबरोबरच वारकरी संप्रदायाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायावर सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये निरूपण घेतले जात असून विविध विषयांवरील कीर्तन प्रशिक्षणामुळे बाल वारकरी उत्साहाने सहभागी होत आहेत.
शिबिरासाठी विविध मान्यवर कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी संप्रदायातील अभ्यासक मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था, सात्विक आहार आणि भक्तिमय वातावरणाची विशेष सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीतील बालकलाकार समर्थ जाधव याची उपस्थिती हे शिबिराचे विशेष आकर्षण ठरत आहे. वडगाव मावळ येथील समर्थ जाधव याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “राजे शिवछत्रपती” मालिकेत त्याने बाल यशवंतरावांची भूमिका साकारली आहे. तसेच “जुने फर्निचर”, “फिरस्ता” आणि “तुरियम” यांसारख्या चित्रपटांतही त्याने अभिनय केला आहे.
समर्थ जाधव शिबिरात सहभागी झाल्याने इतर बाल वारकऱ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्यासोबत संवाद साधण्यासाठी मुलांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. संस्कार, अध्यात्म आणि परंपरेची सांगड घालणारे हे शिबिर सध्या मावळ तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
0 Comments