Ticker

6/recent/ticker-posts

“हे देवा… चेहऱ्यावर हसू आहे, पण मनात इतका द्वेष का?”

माणुसकी जपा… कारण निवड आपल्या हातात आहे

एकदा एका व्यक्तीने हे देवा! असा भावपूर्ण प्रश्न विचारला —
“हे देवा! तुम्ही आम्हाला बुद्धी दिली, ज्ञान दिलं, चांगलं शरीर दिलं, भावना दिल्या… पण मग माणसामध्ये अहंकार, मत्सर, ईर्ष्या आणि द्वेष का निर्माण केला? कुणाला श्रीमंत तर कुणाला गरीब, कुणाला निरोगी तर कुणाला अपंग का बनवलं? तुम्हाला वाटलं असतं तर सगळ्यांना सारखं चांगलं बनवू शकला असता ना?”

देव हसले आणि शांतपणे म्हणाले —
“बुद्धी, ज्ञान, शरीर आणि जीवन मी दिलं… पण अहंकार, मत्सर आणि द्वेष मी दिला नाही. हे सगळं माणूस स्वतः निर्माण करतो. मी फक्त तुम्हाला एक गोष्ट दिली आहे — ‘निवड’.
तुम्ही ठरवायचं… माणुसकीने जगायचं की स्वार्थाने.
एखाद्याच्या डोळ्यात आनंद निर्माण करायचा की दुःख.
मदत करून देवत्वाकडे जायचं की अहंकाराने राक्षसी वृत्ती अंगीकारायची.”

आजची परिस्थिती पाहिली तर या शब्दांचा खरा अर्थ अधिक प्रकर्षाने जाणवतो. आजच्या बदलत्या काळात माणूस विज्ञानाने प्रगत झाला, शिक्षणाने मोठा झाला, पैशाने श्रीमंत झाला… पण मनाने मात्र दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे.

पूर्वी माणसांच्या घरात कमी साधनं होती, पण मनात प्रेम, आपुलकी, आदर आणि माणुसकी होती. आज सर्व काही असूनही समाधान हरवलं आहे. कारण आपण बाहेरून मोठे झालो, पण आतून रिकामे होत गेलो.

आज अनेकांना प्रश्न पडतो — मंदिरात जाण्याची गरज काय? देव सर्वत्र आहे ना?

हो… देव सर्वत्र आहे. पण आजच्या युगात मंदिरात जाणं तितकंच गरजेचं झालं आहे. कारण मंदिरात गेल्यावर निदान काही क्षण तरी माणूस अहंकार विसरून नतमस्तक होतो.

आजच्या बदललेल्या आचार-विचारांमुळे, बदललेल्या खानपानामुळे, वाढलेल्या स्पर्धेमुळे आणि स्वार्थी जीवनशैलीमुळे माणूस स्वतःपासून दूर जात चालला आहे.

मंदिर म्हणजे फक्त देव पाहण्याचं ठिकाण नाही…

तर स्वतःच्या मनात साचलेली घाण साफ करण्याचं स्थान आहे.

मनातील अहंकार, मत्सर, द्वेष, राग आणि लोभ कमी करण्यासाठी मंदिराची पायरी महत्त्वाची आहे.

आज आपण इतके स्वार्थात अडकलो आहोत की, ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या मायबापांबद्दलही विचार बदलत चालले आहेत.

“त्यांनी आमच्यासाठी काय केलं?” हा प्रश्न विचारणारी पिढी निर्माण होत आहे.

पण आपण हे विसरत आहोत की —

जर मायबाप नसते, तर आपणही नसतो.

ज्या आई-वडिलांनी स्वतःच्या आयुष्याची राख करून आपल्या मुलांचं भविष्य घडवलं, त्यांच्याकडे वृद्धापकाळात दुर्लक्ष करणं हीच आजच्या समाजाची सर्वात मोठी शोकांतिका आहे.

मोठेपण पैशाने येत नाही…

मोठेपण संस्काराने येतं.

आज लहानांचा आदर नाही, मोठ्यांचा मान नाही, नात्यांमध्ये प्रेम नाही, आणि मनामध्ये सद्भावना नाही.

म्हणूनच मंदिरात जाणं गरजेचं आहे.

कारण मंदिरात गेल्यावर निदान एवढं तरी जाणवतं की —

आपल्यापेक्षा वर एक शक्ती आहे.

महाभारतात श्रीकृष्ण परमात्म्याने पांडवांसोबत राहून संपूर्ण जगाला धर्म, संयम, कर्तव्य आणि सत्याचा संदेश दिला.

कौरवांकडे सत्ता होती, संपत्ती होती, सैन्य होतं… पण विवेक नव्हता.

पांडवांकडे संकटं होती, संघर्ष होता… पण कृष्ण होता.

आज आपल्या जीवनातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

आपल्या बुद्धीवर अहंकाराची धूळ साचली आहे.

मनामध्ये स्वार्थाची घाण जमा झाली आहे.

दुसऱ्याचं चांगलं पाहून आनंद होण्याऐवजी मत्सर निर्माण होतो.

एखाद्याला मदत करण्यापेक्षा त्याला खाली खेचण्यात आनंद वाटतो.

म्हणूनच आज मंदिरात जाणं गरजेचं आहे…

देवाला काही मागण्यासाठी नाही,

तर स्वतःला बदलण्यासाठी.

मंदिर आपल्याला शिकवतं —

नतमस्तक व्हायला…

संयम ठेवायला…

मोठ्यांचा आदर करायला…

आई-वडिलांची सेवा करायला…

आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माणूस म्हणून जगायला.

आज सोशल मीडियाच्या युगात माणूस चेहऱ्यावर हसू ठेवतो, पण मनातून तुटलेला असतो.

घर मोठं झालं, पण कुटुंब लहान झालं.

पैसा वाढला, पण समाधान हरवलं.

मित्र वाढले, पण माणुसकी कमी झाली.

खरं तर देवाने माणसाला सर्व काही दिलं आहे —

बुद्धी दिली, ज्ञान दिलं, भावना दिल्या, प्रेम दिलं…

पण निवड आपल्या हातात दिली.

आपण ठरवायचं —

अहंकारात जगायचं की माणुसकीत?

स्वार्थात अडकायचं की सेवेमध्ये आनंद शोधायचा?

आई-वडिलांना ओझं समजायचं की देव मानायचं?

कारण शेवटी मंदिरातील देवापेक्षा

आई-वडिलांच्या चरणातच खरा देव असतो.

आज समाजाला गरज आहे ती मोठ्या मंदिरांची नाही…

तर मोठ्या मनांची आहे.

कारण मन स्वच्छ असेल तरच समाज सुंदर बनेल.

चला…

मंदिरात जाऊया…

पण फक्त डोकं टेकवण्यासाठी नाही,

तर मन स्वच्छ करण्यासाठी.

✍️ लेखक : सुधाकर चौधरी



Post a Comment

0 Comments