Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त भटक्या समाजातील महिला-मुलींसाठी जनजागृती अभियान


सहा वर्षांपासून सुरू असलेले जिव्हाळा फाउंडेशनचे कार्य; सॅनिटरी पॅड वाटपासह आरोग्य व सामाजिक प्रश्नांवर मार्गदर्शन

मंगरूळपीर प्रतिनिधी : 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने भटकंती करणाऱ्या कुटुंबांतील महिला व मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छता आणि आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुलींना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व आणि सकस आहाराची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.

जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अश्विनी राम अवताडे यांनी सांगितले की, भटक्या व विमुक्त समाजातील महिला व मुलींच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने काम सुरू आहे. आजही या समाजामध्ये शिक्षणाचाम अभाव आणि अंधश्रद्धेमुळे मासिक पाळी आलेल्या मुलींना सात दिवस वेगळे ठेवण्याची प्रथा कायम आहे. या काळात मुलींना मानसिक आधाराची गरज असताना त्यांना समाजापासून दूर ठेवले जाते. घरातील वस्तूंना स्पर्श केल्यास देवाचा कोप होतो, अशा गैरसमजुती आजही मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ मासिक पाळी व्यवस्थापनच नव्हे तर बालविवाह प्रतिबंधक कायदा, व्यसनमुक्ती, आरोग्य जागृती आणि विविध सामाजिक प्रश्नांवर नियमित समुपदेशन केले जाते. आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन सत्रे आणि प्रत्यक्ष भेटीगाठींमुळे या महिला व मुलींसोबत विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले असून त्या आपल्या समस्या खुलेपणाने मांडत असल्याचे अवताडे यांनी सांगितले.

भटक्या समाजामध्ये अल्पवयीन मुलींमध्ये मासिक पाळी सुरू होताच त्यांचे शिक्षण थांबवून लवकर विवाह लावून देण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. अठरा वर्षांपूर्वी होणारे विवाह आणि कमी वयातील गर्भधारणेमुळे अनेक मुलींना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित राहिलेल्या या समाजघटकांमध्ये बालमजुरी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी आणि बालविवाह यांसारख्या समस्या अधिक तीव्र असल्याचे वास्तव त्यांनी मांडले.

“शासनाच्या अनेक योजना आणि जनजागृती कार्यक्रम राबविले जात असले तरी त्यांचा लाभ प्रत्यक्षात सर्वाधिक गरजू असलेल्या भटक्या समाजातील महिला व मुलींपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही. या घटकांसाठी विशेष प्रयत्न आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे,” असे मत सौ. अश्विनी राम अवताडे यांनी व्यक्त केले.

दरवर्षी करण्यात येणाऱ्या समुपदेशन आणि जनजागृतीमुळे अनेक मुले-मुली पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येत असून बालमजुरी, व्यसनाधीनता आणि बालविवाहाच्या घटनांमध्ये काही प्रमाणात घट झाल्याचेही त्यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जनजागृती हाच प्रभावी मार्ग असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments