देवरुख, प्रतिनिधी : वाशी तर्फे देवरुख उपकेंद्रांतर्गत पाटगाव (कुंभारवाडी) येथे ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
शिबिरात मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी निवड, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, किरकोळ आजारांवरील उपचार, आयुष्मान भारत व वय वंदना कार्डाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कीटकजन्य आजार प्रतिबंधक उपाययोजना, स्वच्छतेचे महत्त्व, उष्माघात प्रतिबंधक उपाय, ० ते ५ वयोगटातील बालकांचे नियमित लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ. नेहा रविंद्र माने उपस्थित होत्या. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच रुपेश जाधव, अनिल साळवी, गणेश साळवी, सुनील गोपाळ, पोलीस पाटील राजाराम खेडेकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दिलीप जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वाशी तर्फे देवरुख उपकेंद्राचे आरोग्य सेवक विजय राऊत, आरोग्य सेविका प्रियांका इंगळे, फिरता दवाखाना (मोबाईल व्हॅन) आरोग्य पथक, धामापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता पवार, मेघा टोंगे, सामुदायिक आरोग्य अधिकारी प्रसाद व्हालकर, आरोग्य सहाय्यक अशोक बोरसे, आरोग्य निरीक्षक प्रशांत आहिरे तसेच तालुका औषध निर्माण अधिकारी जुही नरोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाने सर्वतोपरी सहकार्य केल्याचे यावेळी सांगण्यात आले. अभियानामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा घराजवळ उपलब्ध होऊन जनजागृतीस मोठी मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
0 Comments