संजय ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन; राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
अकोला, प्रतिनिधी : अकोला-मंगरुळपीर मार्गावरील तांदळी फाटा येथे उभारण्यात आलेल्या ‘सुमाई फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड गार्डन’ या अत्याधुनिक उपाहारगृहाचा भव्य शुभारंभ शुक्रवार, दि. २९ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. राजीव गांधी पंचायत राज संघटना महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष मा. संजयजी ठाकरे यांच्या शुभहस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले.
या सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रा. संजय वानखडे, ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गजाननराव वाघमारे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन पावसाळे, शिवसेना पक्षाचे जिल्हा समन्वयक बादलसिंग ठाकूर, सरपंच संघटना अकोलाचे जिल्हाध्यक्ष व सरपंच गोपाळ चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. महेश सरफ, माजी सरपंच प्रकाश बंडुजी जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राठोड परिवाराच्या नव्या व्यावसायिक उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छांचा वर्षाव केला. आधुनिक सुविधा, कुटुंबवत्सल वातावरण आणि दर्जेदार खाद्यसेवा यामुळे ‘सुमाई फॅमिली रेस्टॉरंट अॅण्ड गार्डन’ हे परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
स्वप्नपूर्तीचा भावनिक क्षण
राठोड परिवारासाठी हा दिवस केवळ व्यवसायाच्या प्रारंभाचा नव्हता, तर अनेक वर्षांच्या मेहनती, संघर्ष, जिद्द आणि स्वप्नपूर्तीचा साक्षीदार ठरला. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद देणाऱ्या सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि हितचिंतकांप्रती परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष म्हणजे, प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेल्या अनेक शुभेच्छुकांनी दूरध्वनी, संदेश आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आनंदात सहभाग नोंदविला. त्यांच्या शुभेच्छांमुळे उद्घाटन सोहळ्याचा उत्साह आणखी द्विगुणित झाला.
‘आपले प्रेम हीच आमची खरी संपत्ती’
“माणसाची खरी श्रीमंती त्याच्याकडे असलेल्या पैशात नसून त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये असते. उद्घाटन सोहळ्याला लाभलेले प्रेम, स्नेह आणि आशीर्वाद पाहून आम्ही खरोखरच भाग्यवान असल्याची भावना मनात निर्माण झाली,” अशा शब्दांत राठोड परिवाराने आपल्या भावना व्यक्त केल्या.
भविष्यात ग्राहकांना सर्वोत्तम सेवा, स्वादिष्ट भोजन आणि कुटुंबासह आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आभार प्रदर्शन
उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ व हितचिंतकांचे राठोड परिवारातर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
0 Comments