लेखक : सुधाकर चौधरी
मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याच्या हातात काहीच नसतं…
ना पैसा, ना सत्ता, ना ओळख.
आणि जेव्हा तो या जगाचा निरोप घेतो, तेव्हाही त्याच्या सोबत काहीच जात नाही.
हे साधं सत्य माहिती असूनही माणूस आयुष्यभर अहंकार, पैसा, प्रतिष्ठा आणि दिखाव्याच्या मागे धावत राहतो.
आजच्या युगात प्रत्येक जण स्वतःला मोठं सिद्ध करण्याच्या स्पर्धेत आहे.
कोणाकडे मोठं घर आहे, कोणाकडे महागडी गाडी आहे, तर कोणाकडे अफाट पैसा आहे.
पण या सगळ्या गोष्टी मिळवताना माणूस एक गोष्ट विसरत चालला आहे —
ती म्हणजे “माणुसकी”.
माणूस जन्माला येतो तेव्हा तो पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतो.
त्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, स्वतःचं रक्षण करता येत नाही.
आईच्या मायेवर आणि कुटुंबाच्या आधारावर तो वाढतो.
विशेष म्हणजे, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरही परिस्थिती फार वेगळी नसते.
शेवटच्या क्षणीही माणसाला आधाराची गरज असते.
जन्माच्या वेळी दुसऱ्यांनी आपल्याला पहिलं स्नान घातलेलं असतं आणि मृत्यूनंतरचं शेवटचं स्नानही दुसरेच घालतात.
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते —
माणूस कितीही मोठा झाला तरी तो आयुष्यभर एकमेकांवर अवलंबून असतो.
मग एवढा गर्व कशाचा?
पैशाचा?
सत्तेचा?
शरीराच्या ताकदीचा?
की पदाचा?
आज ज्याच्याकडे सत्ता आहे, उद्या ती दुसऱ्याकडे असणार आहे.
आज ज्याच्या नावाचा दबदबा आहे, उद्या त्याचं नावही लोक विसरणार आहेत.
वेळ ही कोणाची कायमची नसते.
ती राजालाही खाली आणते आणि सामान्य माणसालाही उंचावर नेते.
पैसा कमावणं चुकीचं नाही.
पण पैसा कमावताना माणुसकी हरवणं चुकीचं आहे.
आज अनेक लोक पैशासाठी नाती तोडतात, स्वार्थासाठी माणसं बदलतात आणि अहंकारासाठी स्वतःच्या माणसांनाही दूर करतात.
पण शेवटी माणसाच्या अंत्ययात्रेत त्याचा पैसा सहभागी होत नाही…
सहभागी होतात ती त्याने आयुष्यभर जोडलेली माणसं.
लोक तुमच्याकडे किती संपत्ती होती हे फार काळ लक्षात ठेवत नाहीत;
पण तुम्ही कोणाच्या अडचणीच्या काळात दिलेला आधार आयुष्यभर लक्षात राहतो.
म्हणूनच आयुष्यात पैसा नक्की कमवा, पण त्याचबरोबर चांगले विचार, संस्कार आणि माणुसकीही कमवा.
कारण शेवटी माणूस आपल्या संपत्तीमुळे मोठा होत नाही,
तर आपल्या कर्मामुळे मोठा ठरतो.
एक दिवस प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचाच आहे.
तेव्हा आपल्या मागे राहतील त्या फक्त आठवणी.
जर त्या आठवणी प्रेमाच्या, मदतीच्या आणि माणुसकीच्या असतील, तरच आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल.
म्हणूनच आयुष्य असं जगा की लोकांनी आपल्या पैशाचं नाही,
तर आपल्या स्वभावाचं कौतुक केलं पाहिजे.
इतकं मोठं व्हा की तुमच्या जाण्यानंतर लोकांच्या डोळ्यात अश्रू येतील,
कारण तुम्ही “श्रीमंत” नव्हतात…
तर “मनाने श्रीमंत” होतात.
0 Comments