Ticker

6/recent/ticker-posts

एप्रिल महिन्याच्या धान्यवाटपासाठी मुदतवाढ द्यारास्तभाव दुकानदार संघटनेचे तहसिलदारांना निवेदन


मंगरुळपीर : प्रतिनिधी
तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांना तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी वाटप करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, एप्रिल 2026 च्या उर्वरित धान्यवाटपासाठी किमान दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, माहे एप्रिल, मे व जून 2026 या तीन महिन्यांचे धान्यवाटप करण्याबाबत निरीक्षण अधिकाऱ्यांनी सभा घेऊन सूचना दिल्या होत्या. मात्र अनेक रास्तभाव दुकानदारांच्या दुकानांमध्ये तीन महिन्यांचा धान्यसाठा ठेवण्याइतकी जागा उपलब्ध नसल्याची अडचण बैठकीत मांडण्यात आली होती. त्यावेळी “जेवढे धान्य उपलब्ध होईल त्यामधून वाटप सुरू करावे,” अशा सूचना निरीक्षण अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने दुकानदारांनी उपलब्ध धान्यसाठ्यातून लाभार्थ्यांना धान्यवाटप सुरू केले. मात्र काही दिवसांतच धान्यसाठा संपल्याने वाटप प्रक्रिया तात्पुरती बंद ठेवावी लागली. त्यानंतर दिनांक 13 मे 2026 रोजी कार्यालयीन समूहावर एप्रिल महिन्याच्या धान्यवाटपाची मुदत 15 मे 2026 पर्यंत असल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारक लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली आहे.

लाभार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी एप्रिल 2026 च्या धान्यवाटपासाठी किमान दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

हे निवेदन संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री जी. बी. राऊत, उपाध्यक्ष श्री एस. एस. चौधरी, सचिव श्री एन. जी. पाटील तसेच तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांच्या स्वाक्षरीने तहसिल कार्यालयात सादर करण्यात आले.

Post a Comment

0 Comments