विविध मागण्यांसाठी शहरातून भव्य रॅली; तहसीलदारांना निवेदन सादर
“औषध विक्रेते केवळ व्यापारी नाहीत, तर आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ”
मंगरुळपीर, सुधाकर चौधरी : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला मंगरुळपीर तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व मेडिकल दुकाने बुधवारी दिवसभर पूर्णतः बंद ठेवण्यात आली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी औषध विक्रेत्यांनी एकजूट दाखवत शहरातून शांततापूर्ण पण प्रभावी रॅली काढली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून तहसील कार्यालयावर पोहोचली. तेथे तहसीलदारांना निवेदन सादर करून आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
मंगरुळपीर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात शहर व तालुक्यातील सर्वच मेडिकल व्यावसायिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्व परिसरातील मेडिकल दुकाने दिवसभर बंद असल्याने संपूर्ण तालुक्यात या आंदोलनाची तीव्रता जाणवून आली.
शांततेत निघालेली रॅली ठरली चर्चेचा विषय
मेडिकल व्यावसायिकांच्या एकतेचे दर्शन घडवणारी ही रॅली शहरात चर्चेचा विषय ठरली. हातात फलक, विविध मागण्यांचे घोषवाक्य आणि शासनाने मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशा मागण्यांसह औषध विक्रेते रस्त्यावर उतरले होते. “औषध विक्रेते वाचवा, आरोग्य व्यवस्था वाचवा”, “औषध विक्रेत्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा” अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला.
रॅलीदरम्यान पूर्ण शांतता व सुव्यवस्था राखण्यात आली होती. शहरातील नागरिकांनीदेखील या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत औषध विक्रेत्यांच्या भूमिकेला समर्थन दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनाची वेळ
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. अनेक वेळा निवेदने, बैठका व चर्चांद्वारे प्रश्न मांडण्यात आले. मात्र त्यावर ठोस निर्णय न झाल्याने अखेर देशव्यापी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.
“औषध विक्रेते हे केवळ व्यवसाय करणारे व्यापारी नसून आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. डॉक्टर, रुग्णालये आणि रुग्ण यांच्यामध्ये औषध विक्रेते महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेवर होणार आहे,” असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
कोरोना काळातील सेवांची आठवण
विशेष म्हणजे औषधे ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणारी बाब असून आजपर्यंत अत्यंत गंभीर परिस्थितीतही मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ क्वचितच आली होती. कोरोना महामारीसारख्या संकटकाळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना औषध विक्रेत्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना अखंड सेवा पुरवली होती.
कोरोनाच्या भीतीच्या वातावरणातही मेडिकल दुकाने सुरू ठेवून नागरिकांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्याचे काम औषध विक्रेत्यांनी केले होते. त्यामुळेच आजच्या आंदोलनामुळे नागरिकांमध्येही आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली जात होती.
रुग्णांची गैरसोय; नागरिकांमध्ये चिंता
मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद असल्याने नियमित औषधांवर अवलंबून असलेले रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, रक्तदाब व हृदयरोगाचे रुग्ण तसेच आपत्कालीन सेवांची गरज असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक नागरिकांना आवश्यक औषधांसाठी शहरभर भटकंती करावी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
“औषधे ही दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यावश्यक सेवा आहे. मेडिकल दुकाने बंद राहिल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत होणार नाही का?” असा सवाल अनेक नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
तातडीच्या सेवेसाठी विशेष व्यवस्था
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संघटनेच्या वतीने काही प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक तातडीच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. अत्यावश्यक परिस्थितीत औषधांची गरज भासल्यास नागरिकांना मदत करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
तातडीच्या सेवेसाठी संपर्क :
- श्री गोपाल ठाकरे — 9850492416
- श्री नितीन हरणे — 8856031286
- श्री सचीन बंग — 9423374626
- श्री शिरीष बाहेती — 9881142085
- श्री कैलास जाजू (रोडबाजार) — 8888119415
आंदोलनात सहभागी मान्यवर
या आंदोलनात गिरीश भाऊ बाहेती, नंदूभाऊ आसावा, मंगेश भाऊ छल्लाणी, प्रदीप भाऊ बाहेती, गोपालभाऊ ठाकरे, शिरीष भाऊ बाहेती, सचिन भाऊ बंग, नितिन हरणे, विशाल गायकवाड, दिनेश बजाज, मोहम्मद उमैर, मोहम्मद सादिक, शहबाज़ खान, फ़ैज़ान खान, मोहम्मद मुजाहिद, ज़ोएब अली फारूकी, राम फुसे (धानोरा), कैलास जाजू (शेलूबाजार), अजय बुरकुले (शेलूबाजार), सौ. वर्षा आसावा, सौ. दिशा बजाज, सौ. स्मिता तो औरलानी, सौ. तलोकर, सौ. सुरेखा बाहेती, सौ. पूजा लोहिया आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रशासनाकडे न्याय्य निर्णयाची मागणी
मंगरुळपीर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. औषध विक्रेत्यांच्या मागण्यांचा शासन स्तरावर गांभीर्याने विचार करून तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
औषध विक्रेत्यांचे प्रश्न प्रलंबित राहिल्यास भविष्यात आरोग्य व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि शासन स्तरावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments