Ticker

6/recent/ticker-posts

पोस्टर स्पर्धा व पथनाट्यातून एनसीसी विद्यार्थ्यांची तंबाखूविरोधी जनजागृती



वाशिम, दि. 31 मे : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त येथील श्री बाकलीवाल विद्यालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृतीपर पोस्टर स्पर्धा व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ११ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोलाच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील ४५ एनसीसी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तंबाखूविरोधी प्रभावी संदेश दिला.


जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे व जिल्हा आरोग्य अधिकारी पांडुरंग ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “जिंदगी चुने, तंबाखू नहीं” या संदेशावर आधारित आकर्षक पोस्टर्स सादर केली. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून शहरातील विविध चौकांमध्ये जाऊन नागरिकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली.

एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी तंबाखू व निकोटीन उत्पादनांच्या मागील उद्योगांच्या क्लुप्त्या उघड करत व्यसनमुक्तीचा संदेश दिला. यावेळी उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी व मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. पांढारकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती सोशल मीडिया, शालेय साहित्य व खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने केल्या जात असल्याने युवकांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तंबाखू नियंत्रण विभागाचे रामकृष्ण धाडवे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आयुष्यभर तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प केला.

स्पर्धेत सेजल सरनाईक हिने प्रथम, कार्तिकी मारवाडी हिने द्वितीय तर अथर्व चांगटे याने तृतीय क्रमांक पटकावला. समीक्षा घुगे व अनुजा काकडे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात आले. विजेत्यांना उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षक किशोर राठोड व एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

===================================




Post a Comment

0 Comments