Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!


सरकारने फसवणूक थांबवावी; अन्यथा राज्यभर जनआंदोलन उभारू – कल्याणराव आखाडे

वाशिमच्या ओबीसी जनगणना परिषदेत एल्गार; २०२९ मध्ये ताकद दाखविण्याचा इशारा


"ओबीसी जनगणना परिषदेत प्रास्ताविकातून जातीनिहाय जनगणनेची भूमिका मांडताना सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठारी."

वाशिम | प्रतिनिधी

ओबीसी समाजाला वारंवार आश्वासनांचे गाजर दाखवून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. आगामी जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात आली नाही, तर राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारून सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा थेट इशारा सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी वाशिम येथे दिला.

सावता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "ओबीसी जनगणना परिषदेला" विदर्भभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओबीसी समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सभागृहात ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.


"स्वतंत्र कॉलमच नाही; मग जनगणना कशी?"

अध्यक्षीय समारोपात बोलताना कल्याणराव आखाडे म्हणाले की, केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रस्तावित जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसल्याचे दिसत आहे. हा ओबीसी समाजाचा विश्वासघात असून देशातील सर्वात मोठ्या सामाजिक घटकाची खरी लोकसंख्या, शैक्षणिक स्थिती, आर्थिक परिस्थिती आणि प्रतिनिधित्वाचे वास्तव लपविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

"ओबीसींची ताकद २०२९ मध्ये दिसेल"

"ओबीसी समाजाच्या विकासासाठी अचूक आकडेवारी आवश्यक आहे. जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय आरक्षण, शैक्षणिक सुविधा, रोजगार आणि प्रतिनिधित्वाबाबत योग्य धोरणे आखता येणार नाहीत. सरकारने ओबीसी समाजाच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर मोठे जनआंदोलन उभे राहील. २०२९ च्या निवडणुकीत ओबीसी समाज आपली ताकद दाखवून देईल," असा इशाराही त्यांनी दिला.

ओबीसी हक्कांसाठी एकजुटीचे आवाहन

परिषदेत उपस्थित विविध मान्यवरांनी ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याचे आवाहन केले. जातीनिहाय जनगणना ही काळाची गरज असून ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

परिषदेला माजी आमदार हरिदासजी भदे, माजी आमदार बळीरामजी सिरसकर, वाशिम नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिलभाऊ केंदळे, उपनगराध्यक्ष राजूभाऊ भांदुर्गे, सावता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेशजी दळवी, कार्याध्यक्ष संतोषजी राजगुरे, संघटक गोपाळ भुरभुरे, नगरसेवक राजू काळे, नितीनजी मडके, जयश्रीताई वानखडे, नितीनजी उलेमाले, अशोकराव अंभोरे, श्रद्धाताई इंगोले, भाजपा नेते तथा नगरसेवक जयंतभाऊ मसने यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत सावता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष रवी भांदुर्गे यांनी केले तर प्रास्ताविक प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठारी यांनी मांडले.

परिषद यशस्वीतेसाठी परिश्रम

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाध्यक्ष विलास ढगे, शहराध्यक्ष चेतन इंगोले, गजानन ठेगडे, रवी वानखडे, रंजनाताई पारस्कर, शेखर जटाळे, रवी घाटे, बालू माल, रामेश्वर राऊत, विकी राऊत, चेतन शिंदे, रेखाताई जहिराव, दिपालीताई काळे, लक्ष्मणराव निखाडे, दिनेश सोळंके, शाम मेहत्रे, दत्ताभाऊ जावळकार, अजय ढोणे, संकेत मसने, उमेश राऊत, ओम पोफळे, निलेश नागापुरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

चौकट

ओबीसी परिषदेतून सरकारला थेट इशारा

🔹 ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करा

🔹 जनगणनेत स्वतंत्र कॉलमचा समावेश करा

🔹 सामाजिक व आर्थिक आकडेवारी जाहीर करा

🔹 अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू

🔹 २०२९ मध्ये राजकीय ताकद दाखवू

"जनगणना नाही, तर आंदोलन अटळ!"

Post a Comment

0 Comments