पांगरी महादेव ग्रामस्थांचा समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा; प्रशासनाच्या हस्तक्षेपाने आंदोलन तात्पुरते स्थगित
मंगरूळपीर प्रतिनिधी किशोर देशमुख
तालुक्यातील पांगरी महादेव (ता. मंगरूळपीर, जि. वाशिम) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट व रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला असून, अखेर ग्रामस्थांनी 31 मे 2026 रोजी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत महसूल व पोलीस प्रशासन सतर्क झाले आणि आंदोलन स्थगित करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या.
गावकऱ्यांच्या तीव्र नाराजीची दखल घेत तहसीलदार अनासने, मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप क्षीरसागर तसेच हालसुर-पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नवघरे यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांच्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे प्रशासनाने मान्य केले.
दरम्यान, वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय बापू देशमुख यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
आश्वासनांची मालिका; काम मात्र ठप्पच
यापूर्वी 13 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत संबंधित ठेकेदाराच्या अभियंत्याने तहसीलदार, पोलीस अधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांसमोर 30 मेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही काम पूर्ण होणे तर दूरच, प्रत्यक्षात कामाची गतीही अत्यंत मंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, संबंधित ठेकेदार आणि विभागीय अधिकाऱ्यांकडून वारंवार चुकीची माहिती दिली जात असून प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
"डिझेल टंचाई"चे कारण पुढे करून प्रशासनाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न?
रस्त्याचे काम रखडण्यामागे डिझेल टंचाईचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडून वारंवार जिल्ह्यात डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असतानाही संबंधित ठेकेदारांकडून "डिझेल उपलब्ध नसल्याने काम थांबले" असा दावा करण्यात येत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात पत्रकार सचिन राणे आणि किशोर देशमुख यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत संबंधित ठेकेदारांच्या दाव्यांतील विसंगती निदर्शनास आणून दिली. प्रशासनाने जनतेसमोर दिलेली माहिती आणि ठेकेदारांचे दावे यामध्ये मोठा विरोधाभास असल्याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
शासनाचा निधी, ठेकेदारांचा नफा आणि गावकऱ्यांचा त्रास
ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, शासनाच्या निधीतून विकासकामे होत असताना काही ठेकेदार केवळ आर्थिक नफ्याच्या उद्देशाने कामे रखडवत आहेत. परिणामी गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शासन आणि प्रशासनाची विनाकारण बदनामी होत आहे.
"रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गावकऱ्यांची फसवणूक आणि प्रशासनाची दिशाभूल आम्ही सहन करणार नाही," असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
आंदोलन स्थगित; पण संघर्ष कायम
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांनंतर समृद्धी महामार्गावरील आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी ग्रामस्थांनी आपला संघर्ष मागे घेतलेला नाही. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
0 Comments