Ticker

6/recent/ticker-posts

२४ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलनात ललवाणी अॅग्रो टुरिझमला ‘स्मार्ट पर्यटन’ पुरस्कार


भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे शिवारात उभारण्यात आलेल्या ललवाणी अॅग्रो टुरिझमला आंतरराष्ट्रीय वर्ल्ड सेव्हन वंडर संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘स्मार्ट पर्यटन’ पुरस्कार जाहीर झाला. अमरावती येथे आयोजित २४ वे अखिल भारतीय प्रतिभा महासम्मेलन, संत चेतना महाकुंभ व प्रकृती-अध्यात्म समागम या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (एच.व्ही.पी.एम.), अमरावती येथील स्व. सोमेश्वर पुसदकर स्मृती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात देशातील १६ राज्यांतील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. परमपूज्य संत डॉ. शिवयोगीजी महाराज, संत सयाजी महाराज, संत कृष्णकांत महाराज, सुशील महाराज वनवे, ब्रह्माकुमारी सीता दीदी, राजाभाऊ उंबरकर, प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे, त्यागमूर्ती आरती सचदेव, अमरावती जिल्हा वकील संघ तसेच अॅड. डॉ. क्रांती महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले.

कार्यक्रमात अॅड. डॉ. क्रांती महाजन यांनी ललवाणी अॅग्रो टुरिझमच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, अल्पावधीतच या पर्यटनस्थळाने कृषी, ग्रामीण पर्यटन, गोसेवा, प्राकृतिक चिकित्सा आणि पर्यावरण संवर्धन यांचा आदर्श संगम घडवून ग्रामीण पर्यटनाला नवी दिशा दिली आहे. शहरातील नागरिकांना "खेड्याकडे चला, निसर्गाशी नाते जोडा" हा संदेश देत नैसर्गिक, शांत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा उत्कृष्ट नमुना उभारण्यात यश मिळाले आहे.

येथील मनजिया रेस्टॉरंटमध्ये अस्सल खानदेशी शाकाहारी भोजन, रेन डान्स, पंचवटी, शिवार फेरी, गणेश मंदिर तसेच आंबा, नारळ, पेरू, सीताफळ, रामफळ, अंजीर, संत्री, मोसंबी आदी विविध फळबागा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. स्वच्छता, उत्कृष्ट व्यवस्थापन, गोसेवा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच या संस्थेची ‘स्मार्ट पर्यटन’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे अॅड. डॉ. महाजन यांनी सांगितले.

पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी म्हणाले, "नवा भारत घडविण्यासाठी समाजहिताची प्रत्येक चळवळ ही लोकसहभागातूनच यशस्वी होते. शिक्षण, कृषी, गोसेवा, प्राकृतिक चिकित्सा आणि पर्यटन या क्षेत्रांतील कार्य अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प आहे." त्यांनी या यशाचे श्रेय कुटुंबीय, सहकारी, मित्रपरिवार आणि शुभेच्छुकांना दिले.

निवृत्तीनंतरही कृषी, गोसंवर्धन, ग्रामीण पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेले ललवाणी अॅग्रो टुरिझम हे जळगाव जिल्ह्यासाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत असल्याचे गौरवोद्गार अॅड. डॉ. क्रांती महाजन यांनी काढले.

प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांना यापूर्वी आदर्श शिक्षक, शिक्षाशिरोमणी, समाजशिरोमणी, उत्कृष्ट संघटक आणि जीवन गौरव यांसह अनेक राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शिक्षण, समाजसेवा, कृषी, गोसेवा, ग्रामीण पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे हा राष्ट्रीय सन्मान जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.

Post a Comment

0 Comments