Ticker

6/recent/ticker-posts

गुरुमाऊली संत वासुदेव महाराज पालखीचे आज अकोला नगरीत आगमन; राजराजेश्वर महानगरीत जंगी स्वागताची जय्यत तयारी


तीन दिवस अकोल्यात मुक्काम; हरिनाम, कीर्तन, महाप्रसाद व भक्तिमय वातावरणाने शहर दुमदुमणार

अकोला, दि. २८ (प्रतिनिधी गजानन हरणे ) :
श्रीक्षेत्र श्रद्धासागर, अकोट येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या विदर्भ माऊली ह.भ.प. श्रीसंत वासुदेव महाराज यांच्या भव्य पालखी पायदळ सोहळ्याचे आज, रविवार (दि. २८ जून) सायंकाळी ५ वाजता अकोला शहरात भक्तिभावाने आगमन होत असून, राजराजेश्वर महानगरीसह संपूर्ण शहरात या सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

यंदा पालखी सोहळ्याचे सोळावे वर्ष असून, विठ्ठलभक्ती, सेवा, समता आणि वारकरी संस्कृतीचा संदेश देत हजारो वारकरी हरिनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. पालखीचे शहरात प्रथम स्वागत रेल्वे स्टेशन परिसरातील हिंदू धर्मशाळेजवळ पुंडकर परिवाराच्या वतीने करण्यात येणार आहे.

यावेळी आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमदार साजिद खान पठाण, आमदार नितीन देशमुख, महापौर शारदाताई खेडकर, माजी आमदार अमोल मिटकरी, नगरसेवक पवन महल्ले, समाजसेवक गजानन हरणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, वारकरी, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे पूजन व दर्शन घेणार आहेत.

यानंतर पालखी तापडिया नगर, सातव चौक मार्गे दिवेकर वाचनालय सभागृहात मुक्कामी पोहोचेल. येथे गोपालराव दोड परिवाराच्या वतीने महाप्रसाद व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दि. २९ जून रोजी पालखी गुप्ते मार्ग, उमरी रोड, मोठी उमरी विठ्ठल मंदिर, जठारपेठ चौक, सिद्धिविनायक गणेश मंदिर, जैन वाटिका, मुकुंदनगर मार्गे गजानन मंदिर येथे पोहोचणार असून, विविध ठिकाणी स्वागत, फराळ, महाप्रसाद व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. संतोष सावरकर परिवाराच्या वतीने गजानन मंदिर येथे रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दि. ३० जून रोजी पालखी गजानन पेठ, राऊतवाडी, गणेशनगर, हनुमान नगर, विद्यानगर, सहकारनगर, तुकाराम चौक, कोठारी वाटिका मार्गे गुरुकुल नगरी, खडकी येथे मुक्कामी पोहोचेल. या मार्गावर विविध संस्था, मित्र परिवार आणि भक्तांच्या वतीने स्वागत, फराळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १ जुलै रोजी दत्त मंदिर, शक्तीनगर, कौलखेड चौक, सिंधी कॅम्प, गांधी चौक, राजराजेश्वर मंदिर, वाशिम बायपास मार्गे पालखीचा शहरातील अंतिम प्रवास होईल. प्रभात किड्स येथे गजानन नारे परिवाराच्या वतीने स्नेहभोजन व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून, त्यानंतर पहाटे सहा वाजता पालखी चिखलगाव व पातूर मार्गे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पुढील प्रवासासाठी प्रस्थान करणार आहे.

अकोला शहरात सलग तीन दिवस मुक्काम करणाऱ्या या दिव्य पालखी सोहळ्यादरम्यान विविध ठिकाणी हरिनाम सप्ताह, कीर्तन, भजन, पालखी पूजन, महाप्रसाद व दर्शन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेवराव महल्ले तसेच गुरुमाऊली स्वागत समितीचे अविनाश गावंडे, जयदीप सोनखास्कर आणि समस्त गुरुमाऊली भक्त परिवार यांनी सर्व भाविकांनी संत वासुदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन या भक्तिमय सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.




Post a Comment

0 Comments