Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोलीतून माहिती अधिकार बचाव आंदोलनाचा बिगुल!


सरकारच्या RTI दुरुस्त्यांविरोधात राज्यव्यापी लढा; अण्णा हजारे ५ जुलैला उपोषणावर

गडचिरोली | प्रतिनिधी

माहितीचा अधिकार (RTI) कायद्यात सरकारने केलेल्या दुरुस्त्या आणि नव्या तरतुदींविरोधात राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येणार असून, त्याचबरोबर न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती लोक आंदोलन न्यासच्या कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी दिली. त्या गडचिरोली येथे आयोजित आंदोलन संघटन बांधणी सभेत बोलत होत्या.

कल्पना इनामदार यांनी सांगितले की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ५ जुलै २०२६ रोजी माहिती अधिकार कायद्याच्या संरक्षणासाठी उपोषणास बसणार आहेत. माहिती अधिकार कायदा अस्तित्वात येण्यासाठी अण्णा हजारे यांनी २००२, २००३ आणि २००६ मध्ये कठोर उपोषणे केली होती. तसेच राज्यभर गावोगावी, तालुका आणि जिल्हास्तरावर जनजागृती दौरे काढून या कायद्याची व्यापक चळवळ उभी केली होती. त्याच संघर्षामुळे देशाला माहितीचा अधिकार कायदा मिळाला.

मात्र, सरकारने केलेल्या नव्या दुरुस्त्यांमुळे या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या निर्णयाविरोधात राज्यभर जनजागृती मोहीम, आंदोलने आणि कायदेशीर लढा उभारला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निमित्ताने गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि अमरावती असा विदर्भ दौरा सुरू करण्यात आला असून, त्याची सुरुवात गडचिरोली येथून झाली.

यावेळी लोक आंदोलनाचे विश्वस्त स्व. डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सभेला राळेगणसिद्धीचे लोक आंदोलनाचे राष्ट्रीय खजिनदार दत्ताभाऊ आवारी, विश्वस्त अन्सार शेख, गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, आंदोलनाचे जिल्हा नेते व डॉ. कुंभारे यांचे चिरंजीव डॉ. अनंता कुंभारे, माजी अध्यक्ष चंद्रशेखर भडांगे, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यभर संघर्षाची तयारी

माहिती अधिकार कायद्यावरील दुरुस्त्या मागे घेण्याच्या मागणीसाठी राज्यभर व्यापक जनजागृती, आंदोलन आणि न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. अण्णा हजारे यांच्या प्रस्तावित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ही चळवळ अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments