मुख्यमंत्र्यांकडे आमदार श्याम खोडे यांची जोरदार पाठपुरावा; वाशिम-मंगरूळ मतदारसंघासाठी १०० केव्हीएचे १५० रोहित्र मंजूर
मंगरूळपीर | सुधाकर चौधरी
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी अखंडित वीजपुरवठा उपलब्ध व्हावा आणि वीजअभावी शेतीचे नुकसान होऊ नये, यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही वाशिम-मंगरूळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे यांनी दिली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वीज समस्येकडे गांभीर्याने लक्ष वेधले.
रब्बी हंगामात शेतीला ओलिताची सर्वाधिक गरज असते. याच काळात कृषी पंपांना नियमित वीजपुरवठा न मिळणे, रोहित्र वारंवार जळणे, नवीन रोहित्र वेळेत उपलब्ध न होणे आणि प्रलंबित वीज जोडण्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार श्याम खोडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मतदारसंघातील शेतकऱ्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारची वीज समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. विशेषतः रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी पुरेशा क्षमतेचे रोहित्र उपलब्ध करून देण्याबरोबरच जळालेल्या रोहित्रांची तातडीने बदली आणि प्रलंबित कृषी वीज जोडण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
आमदार श्याम खोडे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत वाशिम-मंगरूळ विधानसभा मतदारसंघासाठी १०० केव्हीए क्षमतेचे १५० रोहित्र उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली. यापूर्वी वापरात असलेल्या ६५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रांच्या तुलनेत १०० केव्हीएचे रोहित्र अधिक विद्युतभार सहन करू शकणार असल्याने वारंवार रोहित्र जळण्याच्या घटनांमध्ये मोठी घट होईल आणि वीजपुरवठा अधिक सक्षम व सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
तसेच मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषी वीज जोडण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्याम खोडे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना आमदार श्याम खोडे म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हे महायुती सरकारचे धोरण आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याचा कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. भविष्यातही मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येसाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू राहील."
या निर्णयामुळे वाशिम-मंगरूळ विधानसभा मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, रब्बी हंगामात सिंचनासाठी आवश्यक वीजपुरवठा अधिक सक्षम व अखंडित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0 Comments