चातक पक्षाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसले शेतकरी, ग्रामस्थ व पशुधन
वाशिम, दि. ___ (प्रतिनिधी) :
विदर्भासह वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुधन चिंतेत सापडले आहे. ग्रामीण भागात प्रचलित असलेल्या "रोहिणी बरसली तर वर्षभर पाऊस चांगला पडतो" या समजुतीला यंदा छेद मिळाला असून रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेल्यानंतर मृग नक्षत्रानेही निराशा केल्याचे चित्र दिसून येत आहे.
मृग नक्षत्र सुरू होऊन चार दिवसांहून अधिक कालावधी लोटला असतानाही जिल्ह्यात पेरणीयोग्य पावसाचा थेंबही पडलेला नाही. उलट ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे सर्वसामान्य जनजीवन होरपळून निघाले आहे. परिणामी शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत अक्षरशः चातक पक्षाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी शेतजमिनीची मशागत, नांगरट, बियाणे व खतांची तयारी पूर्ण केली आहे. अनेकांनी आर्थिक जोखीम पत्करून बियाणे व कृषी साहित्य खरेदी केले. मात्र पाऊस नसल्याने पेरणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. योग्य वेळी पाऊस न आल्यास उत्पादनावर परिणाम होऊन आर्थिक संकट अधिक गडद होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. विहिरी, बोअरवेल आणि नदी-नाले आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दूरवर जावे लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असून हिरव्या चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल झाले आहेत.
ज्येष्ठ शेतकरी केशवराव राऊत पाटील यांनी सांगितले की, “पूर्वी मृग लागला की शेतात चिखल व्हायचा. आता रोहिणी आणि मृग दोन्ही कोरडे जात आहेत. बदलत्या हवामानाचा फटका थेट शेतकऱ्याला बसत आहे.”
दरम्यान, हवामान खात्याने अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरात अद्याप कमी दाबाचे क्षेत्र निर्माण न झाल्याने मान्सूनचा वेग मंदावल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुढील काही दिवस विदर्भात पेरणीयोग्य पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.
पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता केवळ आभाळाकडेच नव्हे तर शासनाच्या मदतीकडेही आशेने पाहत आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणी, उत्पादन घट आणि वाढते कर्ज या संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
— संजय कडोळे
(महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार)
गोंधळीनगर, कारंजा (लाड), जि. वाशिम.
0 Comments