Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्ह्यात महेश नवमी उत्सव उत्साहात; धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी अवघा जिल्हा भक्तिमय


मंगरूळपीर, सुधाकर चौधरी : वाशिम जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही महेश नवमी उत्सव पाच दिवस अत्यंत उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. वाशिम जिल्हा माहेश्वरी सभा, वाशिम जिल्हा माहेश्वरी महिला संघटना आणि वाशिम जिल्हा माहेश्वरी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा तसेच बालसंस्काराशी निगडित विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, अनसिंग तसेच इतर भागातील हजारो नागरिकांनी विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महेश नवमी उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.

पावसाळ्याच्या आगमनाने निसर्गरम्य वातावरणात साजऱ्या झालेल्या या उत्सवाची सुरुवात ॐ शक्ती योग अंतर्गत १०८ ओंकार जपाने झाली. या आध्यात्मिक उपक्रमात जिल्हाभरातील एकूण १३० महिलांनी सहभाग घेतला. त्यामध्ये वाशिम येथील ७८, मंगरूळपीर येथील २०, कारंजा येथील १७ तर अनसिंग येथील १५ महिलांचा समावेश होता. या सामूहिक ओंकार जपामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य योगशिबिरालाही महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. तब्बल १५० महिलांनी योगाभ्यास करून निरोगी जीवनाचा संदेश दिला. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करण्यात आली.

महिला सक्षमीकरण आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अखिल भारतीय महिला संघटनेच्या वतीने कथाकथन व वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील नऊ स्पर्धकांनी सहभाग घेतला. वाशिमच्या तनिष्क मानधने याने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत विदर्भस्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला. कारंजा येथील कु. शरयू तोतला हिने द्वितीय, तर वाशिमच्या अन्वी तोषणीवाल हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

साहित्य समितीच्या वतीने आयोजित लेखन स्पर्धेत "तुटती दोरियां" या समकालीन विषयावर नाटिका लेखन सादर करण्यात आले. वाशिम आणि रिसोड येथील स्पर्धकांनी सामाजिक आशय असलेल्या प्रभावी नाटिका सादर करून परीक्षकांची दाद मिळविली. स्वर्णिम अध्यात्म, पर्व व संस्कृती समितीच्या वतीने आयोजित वादविवाद स्पर्धेत चार स्पर्धकांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर प्रभावी मते मांडली.

रक्षासूत्र संवाद स्पर्धेत आई-मुलगी, वडील-मुलगी, सखी-सखी, आजी-नात, भाऊ-बहिण अशा विविध नातेसंबंधांवर आधारित भावनिक व संस्कारक्षम संवाद सादर करण्यात आले. या उपक्रमातून भारतीय कुटुंबव्यवस्थेतील नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

बाल व किशोरी विकास समितीच्या वतीने मंत्रोच्चार (व्हिडिओ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात १३ बालकांनी सहभाग घेतला. "माझ्या चांगल्या सवयी" या उपक्रमात जिल्ह्यातील आठ बालकांनी आपले विचार व सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या उपक्रमातून बालसंस्कार, नैतिक मूल्ये आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

महेश नवमी उत्सवानिमित्त आयोजित "महेश नवमी उत्सव" या विषयावरील निबंध स्पर्धेत तब्बल ४९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. तर "प्री-वेडिंग शूटिंगचे दुष्परिणाम" या विषयावर लघु व्हिडिओ संवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनसिंग आणि वाशिम येथील गटांनी आधुनिक सामाजिक विषयावर प्रभावी सादरीकरण करून जनजागृती केली.

समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचा गौरव करण्यासाठी विशेष सन्मान योजनेंतर्गत आदर्श माता-पिता सन्मान, स्वर्णयोग सन्मान तसेच "माझे गाव, माझा अभिमान" या उपक्रमांतर्गत सुमारे ३५० मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळाले.

आरोग्य क्षेत्रालाही उत्सवात विशेष महत्त्व देण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या रक्ततपासणी शिबिराचा तब्बल ५०० नागरिकांनी लाभ घेतला. याचबरोबर २३० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तदानासह आरोग्य जनजागृतीचे विविध संदेशही देण्यात आले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलांमध्ये एकत्रितपणे ५५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. "एक व्यक्ती-एक वृक्ष" या संकल्पनेला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.

बालसंस्कार शिबिरात २३० बालकांना व्यक्तिमत्त्व विकास, संस्कार, भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. वाशिम येथे डॉ. दिगंबर जे. झंवर, सौ. सरोजजी गट्टाणी तसेच अकोला येथील विशालजी सारडा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या व्याख्यानातून मुलांमध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अमृत योजनेअंतर्गत काही तहसीलांमध्ये आयुष्मान कार्ड तयार करण्याचा उपक्रमही राबविण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिकांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

क्रीडा क्षेत्रालाही उत्सवात विशेष स्थान देण्यात आले. क्रिकेट, बुद्धिबळ, लिंबू-चमचा, विविध मैदानी आणि कौटुंबिक स्पर्धांमुळे सर्व वयोगटातील सहभागींचा उत्साह द्विगुणित झाला. विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी महेश नवमी उत्सवाची रंगत अधिक वाढविली. वाशिम येथे "आनंद मेळा व बचपन की यादें" या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. मंगरूळपीर येथे "मायकेचा मान, सासरची शान" या विशेष कार्यक्रमातून महिलांनी कौटुंबिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले. अनसिंग येथे त्रिदिवसीय "नानीबाई का मायरा" या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिरसाचा आनंद लुटला.

महेश नवमी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी वाशिम जिल्हा माहेश्वरी सभा, वाशिम जिल्हा माहेश्वरी महिला संघटना आणि वाशिम जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि समाजबांधवांनी अथक परिश्रम घेतले. सर्व उपक्रमांचे नियोजनबद्ध आयोजन आणि समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग यामुळे यंदाचा उत्सव संस्मरणीय ठरला.


या संपूर्ण उत्सवाचे नेतृत्व माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्षा रेणुका हुरकट, सचिवा माधुरी राठी तसेच महेश नवमी उत्सव संयोजिका पायल छापरवाल यांनी प्रभावीपणे केले. त्यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांना सोबत घेत संपूर्ण वाशिम जिल्ह्यात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या नियोजन, समन्वय आणि नेतृत्वामुळे महेश नवमी उत्सवाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी, संस्कार, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य जनजागृतीचा संगम घडविणारा हा उत्सव समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments