मंगरुळपीर, सुधाकर चौधरी : राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त वाशिम जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या अंतर्गत मंगरुळपीर तहसीलतर्फे समाजसेवेसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या महिला डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी उपस्थित महिला डॉक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी औषधी गुणधर्म असलेली बेल व कडुलिंबाची रोपे भेट देऊन सत्कार करण्यात आला. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा आणि समाजसेवेसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. प्रेमलता असावा, डॉ. सुनिता गट्टाणी, डॉ. अनुराधा राठी, डॉ. आँचल सारडा, डॉ. मंजू वर्मा आणि डॉ. अर्पणा राठी यांचा सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रेमलता असावा यांनी "मानवसेवाच सर्वोच्च धर्म" असल्याचे सांगत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. डॉ. सुनिता गट्टाणी यांनी वृक्षदिंडी उपक्रमासाठी सर्वांना प्रेरित करत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि औषधी वनस्पतींचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित इतर डॉक्टरांनीही समाजसेवा, आरोग्य जनजागृती आणि निरोगी समाजनिर्मितीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला माहेश्वरी महिला संघटनेच्या विदर्भ प्रतिनिधी मीनाक्षी बाहेती, वाशिम जिल्हा सचिवा माधुरी राठी, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा बाहेती यांच्यासह मीना राठी, शारदा भूतडा, ज्योती भूतडा, सुनिता जाखोटिया, पूजा जाखोटिया, श्रुती मेहता, वैष्णवी शर्मा, विनीता भूतडा, कमला राठी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा बाहेती यांनी केले, तर आभार प्रदर्शन मीना राठी यांनी केले. आत्मीयता आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला.
0 Comments