कारंजा : सुधाकर चौधरी
महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी प्रवास योजने'चा लाभ कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील एकाही विद्यार्थिनीपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक त्या मार्गांवर एसटीच्या नवीन फेऱ्या सुरू कराव्यात, बंद झालेल्या फेऱ्या तातडीने पूर्ववत कराव्यात आणि संपूर्ण तालुक्याचे सर्वेक्षण करून विद्यार्थिनींच्या प्रवासाच्या गरजेनुसार नियोजन करावे, अशी ठाम मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योती अनिल गणेशपुरे यांनी केली.
यासंदर्भात त्यांनी कारंजा एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. चांदूरकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या प्रवासाच्या गंभीर अडचणींकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
गणेशपुरे म्हणाल्या की, शासनाने विद्यार्थिनींसाठी मोफत एसटी प्रवासाची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली असली, तरी अनेक गावांमध्ये नियमित एसटी सेवा उपलब्ध नसल्याने या योजनेचा प्रत्यक्ष लाभ विद्यार्थिनींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षणासाठी रोज मोठा संघर्ष करावा लागत असून काहींवर शिक्षण अर्धवट सोडण्याचीही वेळ येत आहे.
यावेळी डोंगरगाव येथील समस्येकडे विशेष लक्ष वेधण्यात आले. पूर्वी सुरू असलेली कारंजा–पिंपळगाव–डोंगरगाव ही एसटी फेरी बंद झाल्यामुळे गावातील सुमारे १७ विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, डोंगरगावप्रमाणेच तालुक्यातील इतर अनेक गावांमध्येही अशीच परिस्थिती असण्याची शक्यता असल्याने एसटी प्रशासनाने प्रत्यक्ष गावागावांत जाऊन विद्यार्थिनींची संख्या, त्यांचा प्रवासाचा मार्ग, बस सेवेची गरज आणि उपलब्ध सुविधा यांचा सखोल आढावा घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. सर्वेक्षणानंतर आवश्यक त्या मार्गांवर नवीन फेऱ्या सुरू कराव्यात तसेच बंद झालेल्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याचीही विनंती करण्यात आली.
ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थिनी या शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र विद्यार्थिनीपर्यंत पोहोचविण्यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा गणेशपुरे यांनी व्यक्त केली.
ठळक मुद्दे
- अहिल्यादेवी होळकर मोफत एसटी योजनेचा लाभ प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचविण्याची मागणी
- डोंगरगाव मार्गावरील बंद एसटी फेरी तातडीने सुरू करण्याची मागणी
- १७ विद्यार्थिनींच्या शिक्षणावर परिणाम
- तालुक्यातील सर्व गावांचे सर्वेक्षण करून नवीन फेऱ्या सुरू करण्याचा आग्रह
- शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या शिक्षणासाठी एसटी सेवा अत्यावश्यक
0 Comments