कारंजा लाड, दि. ६ जुलै :
वाढदिवस म्हणजे केक कापणे, फटाके, पार्टी आणि जल्लोष अशी सर्वसामान्य संकल्पना असली तरी कारंजा लाड येथील योगशिक्षिका, ध्यान मार्गदर्शक व निसर्गप्रेमी डॉ. अर्चना साहेबराव कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजाला प्रेरणा देणारा आगळावेगळा उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला. केक कापण्याऐवजी त्यांनी वैकुंठभूमी (स्मशानभूमी) येथे जाऊन वृक्षारोपण, ध्यानसाधना आणि स्वच्छता अभियान राबवत पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम वैकुंठभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. उपस्थितांनी परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी श्रमदान केले. त्यानंतर डॉ. अर्चना कदम यांनी उपस्थित सर्वांना सामूहिक ध्यानसाधना करून घेतली. योग शिक्षिका व ध्यान मास्टर म्हणून त्यांनी शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात ध्यानाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे समजावून सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, "स्मशानभूमी हे जीवनाचे अंतिम सत्य समजून देणारे ठिकाण आहे. अशा शांत व प्रसन्न वातावरणात ध्यान केल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात, मन शुद्ध होते आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. निसर्गाशी एकरूप होऊन ध्यान केल्याने मानसिक शांतता, आत्मिक समाधान आणि जीवनात नवी ऊर्जा प्राप्त होते." त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काही काळ ध्यान करून आत्मशांतीचा अनुभव घेतला.
ध्यानसाधनेनंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वड, पिंपळ, उंबर, आंबा, कडू निंभ (कडुलिंब), जांभूळ आदी विविध प्रकारच्या देशी व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांचे पर्यावरणीय, औषधी व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. भविष्यात हे वृक्ष मोठे होऊन परिसर हिरवागार करण्याबरोबरच पक्षी, प्राणी व मानवासाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमातून "एक वाढदिवस – एक सामाजिक उपक्रम" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढदिवस केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीही तो साजरा करता येतो, हे डॉ. अर्चना कदम यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व आयोजन कामाक्षीताई सोने यांनी केले. कार्यक्रमात कृपाताई ठाकरे यांनी "सत्यम शिवम सुंदरा" हे भक्तिमय गीत सादर करून संपूर्ण वातावरण अधिक भावपूर्ण आणि आध्यात्मिक बनविले.
यावेळी कृपाताई ठाकरे, कामाक्षीताई सोने, मायाताई धोटे, प्रमिलाताई देशमुख, निशा कुमकर, मीनाताई ठाकरे, श्री. पवार साहेब, श्री. कदम सर तसेच वैकुंठभूमी येथे कार्यरत कर्मचारी व त्यांचे सहकुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. कदम सर यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
विशेष म्हणजे, डॉ. अर्चना कदम यांनी यापूर्वीही सन २०२५ मध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त संत टेकडी येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. समाजोपयोगी उपक्रम, योग, ध्यान, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृती या क्षेत्रात त्या सातत्याने कार्यरत असून सामाजिक कार्यामध्ये त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून अनेकांनी त्यांच्या उपक्रमाचे अनुकरण करण्याची भावना व्यक्त केली आहे.
वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी आहे, हा संदेश डॉ. अर्चना साहेबराव कदम यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर ठेवला. वृक्षारोपण, ध्यानसाधना आणि स्वच्छता अभियानाचा संगम घडवत त्यांनी पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ साधला. त्यांच्या या अनोख्या वाढदिवस सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत असून हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
0 Comments