श्रीसंत वासुदेव महाराजांची 'आरोग्यदायी वारी' ठरतेय प्रेरणादायी जनआंदोलन.
श्रीक्षेत्र श्रद्धासागर (अकोट) ते श्रीक्षेत्र पंढरपूर ६५० किमी पायी प्रवास;
दररोज २५ ते ३० किमी चालत निरोगी जीवनाचा संदेश
25 प्रवचने, किर्तनाद्वारे जनजागर.
अकोला :
टाळ-मृदंगाच्या मंजुळ निनादात, विठ्ठलनामाच्या अखंड गजरात आणि "राम कृष्ण हरी... ज्ञानोबा-तुकोबा..."च्या भक्तिमय वातावरणात निघालेली श्री संत वासुदेव महाराजांची 'पंढरपूरची आरोग्यदायी वारी' आज केवळ धार्मिक परंपरा न राहता निरोगी समाज, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जनचळवळ ठरत आहे.
दि. २६ जून रोजी श्रीक्षेत्र श्रद्धासागर, अकोट येथून प्रारंभ झालेली ही वारी तब्बल ६५० किलोमीटरचा प्रवास करीत २५ दिवसांत श्रीक्षेत्र पंढरपूर गाठणार आहे. या प्रवासात सहभागी वारकरी दररोज किमान २५ ते ३० किलोमीटर पायी चालण्याचा संकल्प पूर्ण करत आहेत. हा प्रवास केवळ पंढरीच्या विठ्ठल भेटीचा नसून, शरीर, मन आणि समाज यांना सुदृढ करण्याचा एक सामूहिक संकल्प ठरत आहे.
पहाटे सहा वाजता श्री संत वासुदेव महाराजांच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर हरिनामाच्या गजरात वारकरी उत्साहाने मार्गक्रमण करतात. दुपारच्या सत्रात प्रवचन, तर सायंकाळी कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माबरोबरच व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समता, स्वच्छता, आरोग्य आणि वैज्ञानिक विचारांचा संदेश २५ प्रवचने , कीर्तनाद्वारे दिला जात आहे. त्यामुळे ही वारी श्रद्धेला विवेकाची जोड देणारी ठरत आहे. यंदाच्या वारीत सुमारे ३०० महिला-पुरुष, युवक-युवती, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत. विविध वयोगटांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हा या उपक्रमावरील समाजाच्या विश्वासाचा पुरावा मानला जात आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, नियमित २५ ते ३० किलोमीटर चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांचा धोका कमी होतो, स्नायू व सांधे सक्षम राहतात तसेच मानसिक ताण कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. अशा प्रकारे ही वारी अध्यात्मासोबत आरोग्यशास्त्राचाही प्रभावी संदेश देत आहे.
या पालखी सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वारी मार्गावरील गावांमध्ये करण्यात येणारे वृक्षारोपण अभियान. "एक वारकरी – एक वृक्ष" या भावनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भक्तीबरोबरच पर्यावरणाची जबाबदारी स्वीकारण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अनेक सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले असून, "भक्तीबरोबर आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी ही वारी काळाची गरज आहे," अशा शब्दांत या उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले आहे.
या पंढरपूरची आरोग्यदायी वारीचे आयोजन श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोट यांच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. वासुदेव महल्ले, उपाध्यक्ष माधवराव ठाकरे, विश्वस्त गजानन दुधाळ, अनिल कोरपे, व्यवस्थापक ह भ प अंबादास महाराज मानकर तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी आणि स्वयंसेवक हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
भक्तीला आरोग्याची जोड, अध्यात्माला विज्ञानाची साथ, पर्यावरणाला कृतीची दिशा आणि समाजाला सकारात्मक परिवर्तनाची प्रेरणा देणारी पंढरीची वारी 'आरोग्यदायी वारी' ही आजच्या काळातील वारी परंपरेची एक अभिनव आणि अनुकरणीय ओळख बनत आहे. या पायदळवारीने परभणी जिल्हा पार करून पंढरपूर कडे निघाली आहे.अशी माहिती वारीत सहभागी असलेले वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गजानन हरणे ,
वारकरी समाजसेवक .
खडकी अकोला
मोबाईल नंबर..9822942623
0 Comments