विद्यार्थ्यांना सामाजिक भान, सायबर सुरक्षा, वाहतूक नियम व व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन
प्रतिनिधी : श्रावणी कामत
तळेगाव दाभाडे : इंद्रायणी महाविद्यालय, तळेगाव दाभाडे येथे ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडिया यांच्या वतीने अकरावीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'जागृती' या जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे, आई-वडील व गुरुजनांचा विश्वास जपणे, प्रतिकूल परिस्थितीत खचून न जाता आयुष्यात यशस्वी वाटचाल करणे, मोठ्यांचा आदर राखणे, संवादकौशल्य विकसित करणे तसेच वाहतूक नियमांचे पालन करणे आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध वक्ते मा. नितीन फाकटकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा शिक्षण, संस्कार आणि चांगल्या कार्यातून स्वतःची ओळख निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सायबर गुन्हे, विविध ॲप्सचा गैरवापर, ऑनलाइन फसवणूक आणि समाजात घडणाऱ्या संवेदनशील घटनांबाबत विद्यार्थ्यांनी सजग राहावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. योगेश घोडके यांच्या प्रस्तावनेने झाली. संस्थेची माहिती सौ. सविता पालवे यांनी दिली, तर दामिनी पथकाविषयी सौ. रेश्मा फडतरे यांनी मार्गदर्शन केले. मनोगत तुषार मेहता यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कृष्णा भांगरे यांनी केले.
या कार्यक्रमास ओम समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट इंडियाचे संस्थापक मल्लेशी कुमार पाणी, अध्यक्ष तुषार मेहता, उपाध्यक्षा रेश्मा फडतरे, सचिव प्रवीण दाभाडे, सहसचिव सविता पालवे, खजिनदार ॲड. सुरेंद्र दाभाडे, ॲड. तेजस दाभाडे, कृष्णा भांगरे, दिलीप वाघमारे, श्रावणी कामत, बाळशंकर, रुपाली मेहता, गोरख काकडे, ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ काळे, शिक्षक, विद्यार्थी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मार्गदर्शनपर उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
0 Comments