Ticker

6/recent/ticker-posts

"महिलांचा अपमान सहन करणार नाही; 'गुंगी गुडिया' वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा तीव्र आंदोलन"

 अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष ज्योतीताई मनोजराव ठाकरे व सामाजिक कार्यकर्त्या ललिताताई चौधरी यांनी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून संबंधितांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. महिलांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


मंगरूळपीर | सुधाकर चौधरी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सौ. सुनेत्राताई पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित अवमानकारक "गुंगी गुडिया" या वक्तव्याविरोधात मंगरूळपीर येथे संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष ज्योतीताई मनोजराव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या ललिताताई चौधरी यांनी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी बोलताना ज्योतीताई ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राजकीय मतभेद असू शकतात; मात्र महिलांचा अपमान करून राजकारण करणाऱ्यांना महाराष्ट्रातील महिला कदापिही माफ करणार नाहीत. महिला नेतृत्वाचा अवमान करणारी भाषा ही संपूर्ण स्त्रीशक्तीचा अपमान असून अशा विकृत मानसिकतेला कायद्याचा चाप बसलाच पाहिजे.

सामाजिक कार्यकर्त्या ललिताताई चौधरी यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, महिला नेत्यांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई झाली नाही, तर अशा प्रवृत्तीला खतपाणी मिळेल. महिलांच्या सन्मानाशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही. महिलांबाबत अपमानास्पद भाषा वापरणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करून समाजात ठोस संदेश देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या संस्कारातून स्त्रीसन्मानाचा दिलेला आदर्श, तसेच सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाई आंबेडकर यांच्यासह देशातील सर्व महिला नेतृत्वाचा गौरवपूर्ण वारसा अधोरेखित करण्यात आला. कोणत्याही महिलेचा अवमान हा संपूर्ण समाजाचा अवमान असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच भारतीय राज्यघटनेने प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असून, महिला नेतृत्वाचा अवमान करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यापुढे महिलांचा अपमान करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगरूळपीर तालुक्यात तीव्र लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा ज्योतीताई ठाकरे व ललिताताई चौधरी यांनी दिला.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी वाशिम आणि पोलीस अधीक्षक वाशिम यांनाही पाठविण्यात आल्या असून, या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments