Ticker

6/recent/ticker-posts

योग, प्राणायाम, ध्यान व सुदर्शन क्रियेद्वारे ७० हून अधिक नागरिकांना तणावमुक्त जीवनाचा अनुभव


कारंजा लाड | प्रतिनिधी

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त कारंजा लाड येथे दि. २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आयोजित करण्यात आलेले पाच दिवसीय 'आनंद अनुभूती शिबिर' उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ७० हून अधिक शिबिरार्थ्यांनी सहभागी होत तणावमुक्त आणि आनंदी जीवनशैलीचा अनुभव घेतला.

शिबिरामध्ये योग, प्राणायाम, ध्यान, सुदर्शन क्रिया तसेच दैनंदिन जीवन अधिक आनंदी, सकारात्मक आणि तणावमुक्त कसे जगावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराचे प्रशिक्षण नागपूर येथील वरिष्ठ प्रशिक्षक नंदा सुगंध दीदी यांनी दिले. तर कारंजा लाड येथील वरिष्ठ प्रशिक्षक अजित घुले यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.

पाच दिवसांच्या या शिबिरातून सहभागी शिबिरार्थ्यांना अंतर्मनातील शांतता, मानसिक स्थैर्य, उत्तम आरोग्य, सकारात्मक विचारसरणी आणि निरोगी जीवनशैलीचा अनुभव मिळाला. जीवनातील ताणतणाव कमी करून आनंदी व संतुलित जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध तंत्रांचा प्रत्यक्ष सरावही शिबिरामध्ये करून घेण्यात आला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संजय सूर्यवंशी, दत्ता ताथोड, सुनील डाखोरे, श्री छंदक आठवले, माधुरी डाखोरे, अंजली घुले, जयश्री सूर्यवंशी, निशा राय, कामाक्षी सोने, सुलोचना मुंडे, एकता गायकवाड आणि हर्षा ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी सहभागी शिबिरार्थ्यांनी प्रशिक्षक व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानत, भविष्यातही अशा आरोग्यदायी व व्यक्तिमत्त्व विकास घडविणाऱ्या शिबिरांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments