वाशिम | सुधाकर चौधरी
पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विविध करिअरच्या संधींबाबत योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नव्या पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षण सभागृहात "पोलीस पाल्य करिअर शिबिर" उत्साहात संपन्न झाले. हा उपक्रम पोलीस अधीक्षक निकेश खाडमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
शिबिरात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे राज्य समन्वयक प्रदीप कोरडे तसेच विभागीय प्रमुख आशिष इंगळे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण, करिअरच्या विविध संधी, व्यक्तिमत्त्व विकास आणि भविष्यातील नियोजन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक लता फड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रमाचे महत्त्व पटवून दिले. तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या मार्गदर्शकांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पडघान (पोलीस कल्याण शाखा) यांनी केले. या करिअर शिबिरात सुमारे २०० ते २५० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभदायी ठरल्याची भावना व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पडघान, पोलीस हेड कॉन्स्टेबल बेबी राठोड, पोलीस कवायत प्रशिक्षक आशिष जयस्वाल तसेच राहुल अवचार यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलीस पाल्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे मार्गदर्शनपर उपक्रम भविष्यातही सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0 Comments