सामाजिक, शैक्षणिक व पर्यटन क्षेत्रातील योगदानाची दखल; ‘भुसावळ जंक्शन’च्या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव
भुसावळ : प्रतिनिधी — सामाजिक, शैक्षणिक, गोसेवा आणि पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा त्यांच्या कर्मभूमीत विशेष सन्मान करण्यात आला. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ डिजिटल न्यूज चॅनलतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘भुसावळ जंक्शन’ या साप्ताहिकाच्या प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रा. डॉ. ललवाणी यांनी प्रदीर्घ काळ शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहून विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे. गोसेवा, शैक्षणिक मदत, सामाजिक उपक्रमांना सहकार्य तसेच दानशूर वृत्तीमुळे त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
‘निसर्गाकडे चला’ हा संकल्प घेऊन त्यांनी ॲग्रो टुरिझम व रेस्टॉरंटच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. ग्रामीण जीवन, निसर्ग आणि पर्यावरणाशी नागरिकांना जोडण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष कौतुकास्पद ठरला आहे. विविध महाविद्यालयांना पुस्तके भेट देणे तसेच सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदतीचा हात देत त्यांनी समाजोपयोगी कार्याला सातत्याने प्रोत्साहन दिले.
यावेळी प्रा. डॉ. नरेंद्र महाले यांनी प्रा. डॉ. ललवाणी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासासह शिक्षण, गोसेवा, सामाजिक कार्य, दानशूर वृत्ती आणि पर्यटन क्षेत्रातील योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळाशी संबंधित ३२ विद्यार्थिनींच्या जीवनप्रवासाची माहिती ‘घरट्यातून आकाशाकडे’ या पुस्तकातून मांडण्याचे कार्यही त्यांनी केले असल्याचे प्रा. डॉ. महाले यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय सावकारे, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, यावलच्या नगराध्यक्षा छाया पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. रजनी सावकारे, यावलचे नगरसेवक अतुल पाटील, भुसावळचे शिक्षण सभापती राजेंद्र आवटे, परीक्षेत बर्हाटे, पुरुषोत्तम नारखेडे तसेच बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
निवृत्त शिक्षक प्रमोद आठवले यांनीही मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. ललवाणी यांच्या कार्यातील सातत्य, सामाजिक जाणिव आणि समाजासाठी काहीतरी देण्याची त्यांची वृत्ती यांचे कौतुक केले.
सन्मानाला उत्तर देताना प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी ‘भुसावळ जंक्शन’ या साप्ताहिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बदलत्या माध्यमविश्वात डिजिटल माध्यमांसोबतच प्रिंट मीडियाचे महत्त्व कायम असल्याचे सांगत त्यांनी साप्ताहिकाचे संपादक गणेश वाघ यांच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले.
“आजपर्यंत अनेक संस्था आणि संघटनांनी माझा गौरव केला आहे. मात्र, ज्या भुसावळ शहराला मी माझी कर्मभूमी मानतो, त्याच कर्मभूमीत माध्यम क्षेत्राच्या वतीने झालेला हा सन्मान माझ्यासाठी विशेष आनंदाचा आणि समाधानाचा आहे,” अशा भावना प्रा. डॉ. ललवाणी यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी आयोजक तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या या विशेष सन्मानाबद्दल हितचिंतक, मित्रपरिवार, आप्तस्वकीय व नातलगांकडून अभिनंदन होत असून, कर्मभूमीत झालेला हा गौरव त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक व शैक्षणिक कार्याची कौतुकाची पावती ठरला आहे.
0 Comments