सुभाष चौकात भाविकांचे उत्स्फूर्त स्वागत; संत बिरबलनाथ महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प
मंगरूळनाथ, सुधाकर चौधरी :
नाथ नगरी मंगरूळनाथ येथे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कावळ यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी नाथसेवा फाउंडेशनच्या वतीने सुभाष चौक या मुख्य ठिकाणी ‘चहापाणी’ स्टॉल उभारून सेवा करण्यात आली. यात्रेसाठी विविध भागांतून आलेल्या भाविकांना चहा व पाण्याचे वाटप करून फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सेवाभाव जपला.
नाथसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, नाथ नगरीचे ग्रामदैवत संत बिरबलनाथ महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार-प्रसार करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. संत बिरबलनाथ महाराज यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन सन २०१८ पासून मंगरूळनाथ, गिंभा, साखरडोह, मानोरा, जनुना, जयपूर यांसह संत बिरबलनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध गावांमधून त्यांच्या जीवनाशी निगडित कथा, परंपरा व आठवणींचे संकलन करण्याचे कार्य सुरू आहे.
या माध्यमातून नाथ संप्रदायाचा इतिहास, परंपरा आणि संत बिरबलनाथ महाराजांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्याला नाथ नगरीतील विविध नाथ भक्त समित्यांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे.
दरम्यान, आगामी संत बिरबलनाथ महाराज समाधी दिन शताब्दी महोत्सव २०२७-२८ हा ऐतिहासिक सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी सर्व नाथ भक्तांनी एकत्र येऊन आपापले योगदान द्यावे, असे आवाहन नाथसेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
कावळ यात्रेच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या चहापाणी सेवेत नाथसेवा फाउंडेशनचे विजेंद्र गुप्ता, सविता गुप्ता, पुंडलिक गादेकर तसेच नाथ समितीतील प्रशांत करपे, सुरेश करपे, तेजस घाटे, विशाल साळवे, आदित्य करपे, दिलीप करपे, सोहम ठाकरे आणि अनुप ठाकरे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
भाविकांची सेवा, संत परंपरेचे जतन आणि नाथ संप्रदायाचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले.
0 Comments