निसर्गरम्य वातावरणात शिक्षक दिन उत्साहात; किड्स गुरुकुल व किड्स नेस्टच्या शिक्षकांचा गौरव
भुसावळ : प्रतिनिधी
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्वचिंतक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा शिक्षक दिन ललवानी ॲग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंटच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भुसावळ येथील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल तसेच कुऱ्हा पानाचे येथील किड्स नेस्ट शाळेतील शिक्षकांचा निसर्गरम्य वातावरणात सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी. एम. ललवानी यांनी शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही, तर राष्ट्र घडविण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य करतो. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य असून, हे भविष्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”
कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर कलाकृती घडवतो, त्याचप्रमाणे शिक्षक बालकाला ज्ञान, संस्कार व शिक्षणाची शिदोरी देऊन सुसंस्कारी, सुशिक्षित आणि सक्षम नागरिक घडवितात, असेही प्रा. डॉ. ललवानी यांनी नमूद केले.
याप्रसंगी किड्स गुरुकुल ग्रुप, भुसावळचे संस्थाचालक, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अनिलभाऊ कोटेचा, प्रमोदभाऊ जैन, तसेच किड्स नेस्टच्या संस्थापिका व मुख्याध्यापिका सौ. पूनम फालक यांचाही सन्मान करण्यात आला.
स्नेहभोजनासह विविध उपक्रमांचा आनंद
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थाचालकांसह शिक्षकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्याचबरोबर ललवानी ॲग्रो टुरिझममधील हिरवाईने नटलेले निसर्गरम्य वातावरण, गोशाळा, ट्रॅक्टरद्वारे शिवार फेरी, इंडोर व आउटडोर गेम्स आदी विविध उपक्रमांचा शिक्षकांनी मनमुराद आनंद घेतला.
“संस्थाचालकांनी दिलेल्या या जिव्हाळ्याच्या वागणुकीमुळे शिक्षक दिनाचा हा दिवस आमच्यासाठी संस्मरणीय ठरला,” अशी भावना उपस्थित शिक्षकांनी व्यक्त केली.
किड्स गुरुकुलच्या मुख्याध्यापिका डॉली स्वामी यांनी ललवानी ॲग्रो टुरिझम व मनजीया रेस्टॉरंटचे कौतुक केले. भुसावळ व परिसरातील गोप्रेमी, निसर्गप्रेमी आणि खवय्यांसाठी सुंदर व रमणीय ठिकाण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी प्रा. डॉ. डी. एम. ललवानी यांचे आभार मानले. शिक्षकांप्रती दाखविलेल्या जिव्हाळ्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
किड्स नेस्टच्या संस्थापिका सौ. पूनम फालक यांनी प्रा. डॉ. डी. एम. ललवानी यांना ‘प्राईड ऑफ भारत’ तसेच ॲग्रो टुरिझमला मिळालेल्या ‘बेस्ट स्टार्टअप’ पुरस्काराबद्दल अभिनंदन केले. शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करून आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. गायत्री जगताप, सौ. मंदा तोरे, ईश्वर तोरे, महेश जगताप, अप्पा जगताप, सखाराम बारेला तसेच रेस्टॉरंटचे आचारी मयूर महाजन यांनी परिश्रम घेतले.
0 Comments