‘बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज फॉर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट-२०२६’ पुरस्काराने दिमाखदार सन्मान
उद्योगाभिमुख प्रशिक्षण, कौशल्यविकास अन् ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
यवतमाळ : प्रतिनिधी विनोद ठाकरे
विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर कौशल्य आणि रोजगाराची दिशा देणाऱ्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यावर मानाची मोहोर उमटली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण आणि प्लेसमेंट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महाविद्यालयाला ‘बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज फॉर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट-२०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुणे येथील सन्नी’ज वर्ल्ड येथे झालेल्या विशेष सोहळ्यात महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले, साई वातीले आणि संचालक डॉ. आशिष लांबट यांनी संस्थेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.
शिक्षणातून थेट रोजगाराची वाट!
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून विद्यार्थ्यांमध्ये उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली कौशल्ये विकसित होणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने गेल्या दोन-तीन वर्षांत इंडस्ट्री-रेडी ट्रेनिंग, सॉफ्ट स्किल्स, अॅप्टिट्यूड ट्रेनिंग, विविध सर्टिफिकेशन प्रोग्राम, इंटर्नशिपच्या संधी आणि सेंटर ऑफ एक्सलन्स सेल यावर विशेष भर दिला.
याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेवर झाला असून विविध कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाल्याने महाविद्यालयाच्या प्लेसमेंट कामगिरीला नवी उंची मिळाली आहे.
काटेकोर निकषांवर जगदंबाची बाजी
महाराष्ट्र एज्युकेशन थिंक टँक, पुणे यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक व पायाभूत सुविधा, प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण, स्वायत्त दर्जा, NAAC A+ मानांकन, विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, रोजगाराच्या संधी, शैक्षणिक प्रगतीचा आलेख आणि प्लेसमेंटमधील कामगिरी अशा विविध निकषांवर महाविद्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले.
या कठोर मूल्यमापनातून जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध करत प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर नाव कोरले.
मान्यवरांची उपस्थिती
पुरस्कार सोहळ्यास डॉ. पराग काळकर, उपकुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; डॉ. नितीन करमाळकर, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ; अभिजित पुरी, सेक्रेटरी डायरेक्टर, एलटीआय माईंडट्री; प्रियंका शक्यवंशी, कंट्री हेड, नॉर ब्रेम्से; राघवेंद्र कुमार, ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ तसेच जॉबिझा मल्टिपल सर्व्हिसेसचे संस्थापक व संयोजक गौरव शर्मा यांच्यासह शिक्षण व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
‘ही तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पावती’
“विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार तयार करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. इंडस्ट्री-रेडी प्रशिक्षण, कौशल्यविकास, इंटर्नशिप आणि कॅम्पस प्लेसमेंटमधील विद्यार्थ्यांची ८० टक्क्यांहून अधिक निवड ही त्याच प्रयत्नांची फलश्रुती आहे. मिळालेला हा पुरस्कार म्हणजे महाविद्यालयाच्या कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पावती आहे,” असे संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी सांगितले.
अथक परिश्रमांना यशाची पावती
महाविद्यालयाला हा मानाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्राचार्य डॉ. प्रविण डाखोळे, उपप्राचार्य डॉ. विजय भांबेरे, विविध विभागप्रमुख आणि प्राध्यापकवृंद यांनी सातत्याने परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, कौशल्य आणि रोजगार या तिन्ही आघाड्यांवर भक्कम कामगिरी उभारणाऱ्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिरपेचात ‘बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज फॉर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट-२०२६’ हा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
0 Comments