बुद्ध प्रतिष्ठान, वाशीचा महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार
वाशी : प्रतिनिधी रेवतीताई आढाव
गरजू, गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या हाताला काम मिळावे, महिलांनी स्वावलंबी व्हावे आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने बुद्ध प्रतिष्ठान, वाशी यांच्या पुढाकारातून ‘रमाई गृह उद्योग’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठीची प्रथम बैठक बुद्ध प्रतिष्ठान येथे अध्यक्ष डॉ. अनंत हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
महिला सक्षमीकरणाला केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता त्याला प्रत्यक्ष रोजगाराची जोड देण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या बैठकीत उपस्थित महिलांशी सविस्तर संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
बैठकीस बुद्ध प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आयु. नेताजी कांबळे, सचिव आयु. मधुकर साळवे, सहसचिव आयुनी. रेवती आढाव, कोषाध्यक्ष आयु. पंडित भालेराव, सहाय्यक कोषाध्यक्ष आयुनी. वैशाली आढाव, माजी अध्यक्ष व कार्यकारी सदस्य माधव चाकुरकर, माजी अध्यक्ष राजविलास बर्वे, कार्यकारी सदस्य सिद्धार्थ साळवे, समन्वयक सतीश पवार सर, सावित्रीबाई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा गीता चापके, सचिव शबाना खान, रिपब्लिकन सेनेच्या अध्यक्षा रेखा इंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना घरातूनच विविध गृहउद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. महिलांनी स्वतःच्या कौशल्याचा विकास करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे, हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
महिलांच्या हाताला काम आणि कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या संकल्पातून ‘रमाई गृह उद्योग’ उपक्रमाला सुरुवात झाली असून, पुढील काळात हा उपक्रम किती महिलांना स्वावलंबी बनवतो, याकडे वाशीकरांचे लक्ष लागले आहे.
शेवटी सर्व उपस्थितांनी परस्परांशी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधत बैठक उत्साहात संपन्न केली.
0 Comments