Ticker

6/recent/ticker-posts

स्व. स्वप्निल स्मृती गोकुल ग्राममध्ये पहिलाच पोळा उत्साहात साजरा


सर्जा-राजांची विधिवत पूजा; कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पोळ्याचा आनंद द्विगुणित

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील स्व. स्वप्निल स्मृती गोकुल ग्राममध्ये पहिल्यांदाच पोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्जा-राजांची विधिवत पूजा करून त्यांना नमन करण्यात आले.


बैल हा शेतकऱ्यांचा केवळ पशुधनाचा घटक नसून शेतकऱ्याच्या कष्टाचा, शेतीच्या परंपरेचा आणि ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक युगात शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर व आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढला असला, तरी बैलांप्रती असलेली शेतकऱ्यांची श्रद्धा आणि आपुलकी आजही कायम आहे. याच भावनेतून गोकुल ग्राममध्ये पोळा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी सर्व सर्जा-राजांची विधिवत पूजा करून नमन केले. त्यानंतर आरती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनीही पोळा सणाचा आनंद घेत ग्रामीण परंपरेशी असलेले नाते जपले.

या कार्यक्रमाला सरकारी अभियोक्ता अॅड. मोहन देशपांडे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता राजीव एम. तडवी, सहाय्यक सरकारी अभियोक्ता रवींद्र रोकडे तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता भूषण भामरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान गोकुल ग्राममधील सर्व नंदींची यथायोग्य पूजा व आरती करण्यात आली. तसेच ग्रामातील कर्मचाऱ्यांचा सन्मान व सत्कार करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.

यावेळी सौ. गायत्री जगताप आणि सौ. मंदा तोरे यांच्या हस्ते बळीराजाचे औक्षण करण्यात आले. याप्रसंगी सखाराम बारेला, गोलू राऊत, अप्पा जगताप, मनोज राठोड, रोशन बारेला, महेश जगताप आणि ईश्वर तोरे यांचा प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पारंपरिक पोळा सणाच्या माध्यमातून शेतकरी, बैल आणि शेती संस्कृती यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित झाले. गोकुल ग्राममध्ये पहिल्यांदाच साजरा झालेला हा पोळा सण उत्साह, श्रद्धा आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.

Post a Comment

0 Comments