बसमधील गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी लंपास!
वाशिम : सुधाकर चौधरी
बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करणाऱ्या चोरट्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अहिल्यानगर बसस्थानक परिसरातून शशिकांत विठ्ठल इधाटे (वय ३१, रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १४.७७० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, अंदाजे किंमत २ लाख २५ हजार रुपये, हस्तगत करण्यात आली आहे.
दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी संजय शिवाजीराव पवार (वय ५०, रा. पाडेगाव, ता. खंडाळा, जि. सातारा, ह.मु. संभाजीनगर, नक्षत्रवाडी) हे कारंजा येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाण्यासाठी कारंजा बसस्थानकावर आले होते. बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरून नेली.
याप्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे कारंजा शहर येथे गुन्हा क्र. ५८२/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाची चक्रे वेगाने फिरली
गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमच्या पथकाने सुरू केला. कारंजा शहर परिसरातील बसस्थानक व गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांची माहिती पोलिसांनी संकलित केली. तपासादरम्यान आरोपीबाबत महत्त्वाची गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागली.
माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी पथक तयार करून तातडीने अहिल्यानगरकडे रवाना केले. आरोपी अहिल्यानगर बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याचा शोध सुरू केला.
पोलिसांची चाहूल लागताच बस पकडण्याच्या तयारीत!
अहिल्यानगर बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचल्याची चाहूल आरोपीला लागताच त्याने बसमध्ये बसून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला बसस्थानकातच ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव शशिकांत विठ्ठल इधाटे असल्याचे सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली १४.७७० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन मिळून आली. तिची किंमत सुमारे २ लाख २५ हजार रुपये आहे.
आरोपीला ताब्यात घेऊन वाशिम येथे आणण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला पोलीस ठाणे कारंजा शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, सपोनि योगेश धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोहवा सुरज खडकेगर्दीत हातसफाई करणाऱ्या चोरट्याचा खेळ खल्लास; एलसीबीची धडाकेबाज कारवाई!, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, गजानन झगरे, पोअंम अमोल इरतकर, संतोष वाघ तसेच चालक सुनिल तायडे यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments