Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीरच्या वर्षा बाहेती ची जिल्हा राजकारणात दमदार एंट्री!

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी नियुक्ती; सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने सोपविली महत्त्वाची जबाबदारी

“राष्ट्रहित सर्वोच्च मानून काम करा!” — जिल्हाध्यक्षा कविता खराटे यांचा विश्वास; पक्ष विस्तारासाठी तळागाळात पोहोचण्याचे आवाहन

मंगरूळपीर | सुधाकर चौधरी

सामाजिक कार्याची नोंद घेतली जाते, तेव्हा जबाबदारीही मोठी मिळते! याचाच प्रत्यय मंगरूळपीर येथे पाहायला मिळाला असून, सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या सौ. वर्षा नारायण बाहेती यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, वाशिम जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मंगरूळपीरच्या महिला नेतृत्वाला थेट जिल्हास्तरीय व्यासपीठ मिळाले असून, भाजप महिला संघटनेत त्यांच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या वाशिम जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिला मोर्चाची ताकद तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात येत असताना वर्षा बोहेती यांच्यावर जिल्हा सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या नियुक्तीमागे केवळ पक्षीय पद नसून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला नेतृत्वावर पक्षाने दाखविलेला विश्वास म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

जिल्हाध्यक्षा कविता खाराट यांचा विश्वासाचा शब्द!

नियुक्तीनंतर भाजपा महिला मोर्चाच्या वाशिम जिल्हाध्यक्षा सौ. कविता परमेश्वरजी खाराट यांनी वर्षा बाहेती यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नियुक्तीपत्रातून वर्षा बाहेती यांच्याकडून लोककल्याणासाठी राष्ट्रहिताला सर्वोच्च मानून प्रामाणिकपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पक्ष विस्ताराच्या दृष्टीने सोपविण्यात आलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडावी, पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अविरत कार्य करावे आणि पक्षाचा नावलौकिक उंचाविण्यात आपला सिंहाचा वाटा असावा, असा विश्वास जिल्हाध्यक्षा कविता खराटे यांनी व्यक्त केला आहे.

ही केवळ नियुक्ती नाही; तर पक्षाने सोपविलेल्या विश्वासाची जबाबदारी आहे, असा संदेश या नियुक्तीपत्रातून स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे.

दिग्गजांच्या उपस्थितीत संघटनात्मक निर्णय

भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीस मंगरूळपीरचे आमदार शामभाऊ खोडे, अकोल्याचे आमदार रणधीरभाऊ सावरकर, कारंजाच्या आमदार सईताई डहाके, भाजप वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ चितलांगे तसेच भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. कविता परमेश्वरजी खाराट यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच महिला कार्यकर्त्यांना अधिक व्यापक जबाबदाऱ्या देण्यावर भर देण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर वर्षा बोहेती यांची जिल्हा सचिवपदी झालेली नियुक्ती मंगरूळपीरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

आता खरी कसोटी कामाची!

जिल्हा सचिवपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर वर्षा बोहेती यांच्यासमोर महिला संघटनेला अधिक बळकटी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. महिलांना संघटित करणे, त्यांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणे, पक्षाची ध्येय-धोरणे घराघरात पोहोचविणे आणि तळागाळातील महिला कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, या माध्यमातून त्यांची पुढील वाटचाल निश्चित होणार आहे.

मंगरूळपीरच्या सामाजिक क्षेत्रातून जिल्हास्तरीय पक्ष संघटनेपर्यंत झालेली ही झेप त्यांच्या कार्याला मिळालेली नवी ओळख ठरत आहे. त्यामुळे पद मिळाले हे महत्त्वाचे असले तरी मिळालेला विश्वास किती प्रभावीपणे कृतीत उतरतो, याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

वर्षा बाहेती यांच्या नियुक्तीचे भाजपा पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.


“सामाजिक कार्याची दखल, पक्षाचा विश्वास अन् जिल्हास्तरीय जबाबदारी; मंगरूळपीरच्या वर्षा बाहेतींची भाजप महिला मोर्चात दमदार झेप!”

वाशिम खबर | आवाज महाराष्ट्राचा
निर्भीड बातमी • स्पष्ट भूमिका • जनतेचा आवाज

Post a Comment

0 Comments