Ticker

6/recent/ticker-posts

जी.एच. रायसोनी विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकथॉनचा अंतर्गत टप्पा उत्साहात संपन्न


३४ संघांतील २०४ विद्यार्थ्यांचा सहभाग; आरोग्य, एआय, सायबर सुरक्षा, शिक्षणासह विविध क्षेत्रांतील नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण

अमरावती | प्रतिनिधी : अनिता यादव

अमरावती : नवकल्पना, तंत्रज्ञान आणि सामाजिक समस्यांवर प्रभावी उपाय शोधण्याच्या उद्देशाने जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे स्मार्ट इंडिया हॅकथॉन (एसआयएच) २०२६चा अंतर्गत हॅकथॉन उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि तांत्रिक कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमात तब्बल ३४ संघांतील २०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


देशव्यापी स्मार्ट इंडिया हॅकथॉन २०२६ अंतर्गत आयोजित या स्पर्धेचा प्रमुख उद्देश विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी गुणवंत संघांची निवड करणे हा होता. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी बहुविषयक संघ तयार करून आरोग्यसेवा, शाश्वत विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, सायबर सुरक्षा आणि डेटा सायन्स यांसारख्या क्षेत्रांतील वास्तविक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर केल्या.

कार्यक्रमाची सुरुवात प्रेरणादायी उद्घाटन समारंभाने झाली. एसआयएच २०२६चे एसपीओसी डॉ. अमोल झाडे यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून समाजोपयोगी आणि प्रभावी तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्याचे आवाहन केले.

यावेळी जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट तसेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. अमित गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल यांनी नवकल्पना आणि कौशल्यविकासासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. तर कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी नवाचार, सहकार्य आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर परिणामकारक उपाय शोधण्याची गरज व्यक्त केली. अशा व्यासपीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील जागतिक स्तरावरील नवप्रवर्तक म्हणून घडण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिवसभर चाललेल्या हॅकथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी सखोल विचारमंथन, प्रोटोटाइप निर्मिती आणि प्रकल्पांचे प्रत्यक्ष सादरीकरण केले. सहभागी संघांच्या प्रकल्पांचे नावीन्यता, व्यवहार्यता, तांत्रिक गुंतागुंत आणि सामाजिक प्रभाव या निकषांवर परीक्षण करण्यात आले.

परीक्षक मंडळात डॉ. महिप बरतरे, डॉ. स्नेहा बोहरा, डॉ. नागार्जुन यादव, डॉ. राजश्री वानखडे, डॉ. भुमाई जुला आणि प्रा. नावेद हक यांचा समावेश होता. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांचे बारकाईने मूल्यमापन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा आणि अतुफा यांनी केले. विद्यापीठाच्या वतीने आयोजित या अंतर्गत हॅकथॉनमुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतांना चालना मिळण्याबरोबरच राष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट इंडिया हॅकथॉन २०२६च्या ग्रँड फिनालेकडे वाटचाल करण्यासाठी निवडल्या जाणाऱ्या संघांना महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड देत समाजाच्या ज्वलंत समस्यांवर उपाय शोधण्याचा विद्यापीठाचा हा उपक्रम नवप्रवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.

Post a Comment

0 Comments