स्थानिक गुन्हे शाखेची विशेष कामगिरी; तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ताब्यात
वाशिम : शहरातील दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, या प्रकरणातील संशयित आरोपीला मेहकर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीकडून चोरीस गेलेले ७ तोळे सोन्याची लगड व ९ तोळे चांदीची लगड, असा एकूण ११ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाशिम शहरातील एरिगेशन कॉलनी, सिव्हील लाईन येथील रहिवासी सिताराम सखाराम वाशिमकर (वय ६५) तसेच योजना पार्क, सिव्हील लाईन येथील अरुण रामराव सरनाईक (वय ५९) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
या घटनांप्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात अनुक्रमे अप. क्र. ४८/२०२५, कलम ३०५(अ), ३३१(३) बीएनएस तसेच अप. क्र. ४६/२०२५, कलम ३०५(अ), ३३१(३) बीएनएस अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न
दोन्ही गुन्ह्यांतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे रॅन्डो उर्फ फिरोज खान साहेब खान (वय ३६, रा. मुखरी चौक, तुकाराम बापू वार्ड, पुसद, जि. यवतमाळ) याला निष्पन्न केले.
पोलिसांनी त्याला मेहकर, जि. बुलढाणा हद्दीतून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने दोन्ही घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
११ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपीकडून पंचांसमक्ष गुन्ह्यात चोरी गेलेला ७ तोळे सोन्याची लगड व ९ तोळे चांदीची लगड, असा एकूण ११ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दोन्ही घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
सदर गुन्ह्यांचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस ठाणे करीत आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड व उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, शेखर मास्कर तसेच पोलीस अंमलदार गजानन अवगळे, दिलीप देवकते, विनोद अवगळे, भूषण ठाकरे, विठ्ठल महाले, तुषार ठाकरे, संदीप दुतोंडे, अविनाश वाढे, संतोष वाघ, शाम इंगळे, सुनील तायडे यांचा सहभाग होता.
तसेच अंगुली मुद्रा शाखा, वाशिमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष भोंडे व पोलीस अंमलदार संदीप सरोदे, महेश आकरे, शितल मानकर, गणेश ब्रिंगल यांनीही तपासात हत्त्वायची भूमिका बजावली.
0 Comments