मानोरा पोलिसांची कारवाई; लोखंडी रॉडसह वाहन जप्त, दोन आरोपींना पोलीस कोठडी
मानोरा : आमगावण फाट्यावरील अरुणावती पेट्रोल पंपावर बाथरूम उघडण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना १९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री घडली. या प्रकरणी मानोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेला लोखंडी रॉड तसेच वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोरा येथून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर वाहनातून एक व्यक्ती आमगावण फाट्यावरील अरुणावती पेट्रोल पंपावर उतरून बाथरूमकडे गेला. त्यावेळी बाथरूममध्ये फिर्यादी/जखमी व्यक्ती अगोदरच असल्याने बाथरूम उघडण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादादरम्यान शिवीगाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
वादाचा आवाज ऐकून वाहनामध्ये बसलेला अन्य आरोपी हातात लोखंडी रॉड घेऊन घटनास्थळी आला. त्याने फिर्यादी व जखमी व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी चार महिलांनीही थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या मारहाणीत दोघे जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे मानोरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ५००/२०२६ दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), २९६, ११५(२), ३५१(२)(३), ३५२, १८९(२), १९० व १९१(२)(३) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री घटनास्थळावरून निघून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला. २० सप्टेंबर २०२६ रोजी मंगरूळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकाच्या मदतीने सापळा रचून जिशान अशफाक फकीरवाले (वय २३) आणि मुबारक रमजान परसवाले (वय ४५), तसेच चार महिला, सर्व रा. गवळीपुरा, दिग्रस, जि. यवतमाळ, यांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपी क्रमांक एकाने गुन्ह्यात वापरल्याचा आरोप असलेला लोखंडी रॉड घटनास्थळावरून जप्त करण्यात आला असून, आरोपींचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या दोन पुरुष आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी (PCR) सुनावली, तर चार महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी (MCR) देण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास मानोरा पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे आणि पोलीस निरीक्षक नयना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रामबाबू सरोदे आणि पोलीस अंमलदार गोकुळ पांडुळे पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी जेरबंद
पेट्रोल पंपावरील वादानंतर पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत पोलिसांनी अवघ्या एका दिवसात सहा जणांना अटक केली असून, गुन्ह्यात वापरल्याचा आरोप असलेले हत्यार व वाहन जप्त करण्यात आले आहे.
— प्रतिनिधी
0 Comments