Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी


खासदार संजय देशमुख यांना गुरुदेव सेवा समितीच्या वतीने निवेदन

मंगरूळपीर : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात यावा, या मागणीसाठी मंगरूळनाथ, मानोरा, कारंजा व परिसरातील श्री गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या दिग्रस येथील निवासस्थानी भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजप्रबोधन, ग्रामविकास, स्वच्छता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जागृतीच्या माध्यमातून समाजाला विधायक दिशा देण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने महाराष्ट्रासह देशभरातील लाखो नागरिकांना प्रेरणा दिली आहे. त्यामुळे राष्ट्रनिर्माणातील त्यांच्या योगदानाचा उचित सन्मान म्हणून त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
ही मागणी संसदेत प्रभावीपणे मांडून केंद्र सरकारचे लक्ष वेधावे तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करावा, अशी विनंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय देशमुख यांच्याकडे केली.
यावेळी खासदार संजय देशमुख यांच्यासोबत विविध सामाजिक व जनहिताच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

यावेळी रामदास पाटील सुर्वे, डॉ. सुनील राऊत, वाशिम जिल्हा गुरुदेव सेवा मंडळाचे सुधाकर भांडेकर गुरुजी, राजूभाऊ बारड, युवा सेवाभावी महेंद्र सावके पाटील, दिनकरराव इहारे, सुनीलभाऊ लकरू, ज्ञानदेव चौधरी, मोहनराव वडे, अरुणदादा भालादन, प्रकाशभाऊ गोटे, विष्णू हरिसिंग राठोड, ओमप्रकाश गोटे, नवनाथ कोंगे, विनोदभाऊ जाधव, लक्ष्मण आवटे, बबनराव लाडके, डॉ. सुधाकर क्षीरसागर आदींसह विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments