Ticker

6/recent/ticker-posts

पावसाने पाठ फिरवली; शेतकरी संकटात!

मंगरूळपीर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वाशिम : सुधाकर चौधरी

पावसाअभावी मंगरूळपीर तालुक्यातील शेती संकटाच्या उंबरठ्यावर असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे असलेले पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर दुष्काळजन्य परिस्थितीची तातडीने दखल घेऊन मंगरूळपीर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, वाशिम यांना निवेदन देण्यात आले.

मंगरूळपीर तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतीपिकांवर त्याचा गंभीर परिणाम झाला असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता मावळत चालल्या असून, शासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

दुष्काळजन्य परिस्थितीचे तातडीने पंचनामे करून पिकांची सद्यस्थिती तपासावी, नुकसानग्रस्त क्षेत्राचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा आणि त्यानंतर मंगरूळपीर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

पावसाअभावी पिकांचे उत्पादन घटण्याची शक्यता असून, आधीच वाढत्या शेतीखर्चाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता तातडीने मदतीचा हात द्यावा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

दुष्काळ ही केवळ शेतीची समस्या नसून त्याचा थेट परिणाम शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणावर, पशुधनावर आणि ग्रामीण जनजीवनावर होत असतो. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दुष्काळसदृश उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी वानखेडे, उपजिल्हाप्रमुख सचिन परळीकर, मंगरूळपीर तालुकाप्रमुख अर्जुन भीमराव पाटील सुर्वे, निखिल इंगोले, भागवत शिंदे, शिवा सावके, धीरज राऊत, राम सावके, ओमप्रकाश इंगळे, राहुल माळी, आनंदा काळे आणि शंकर सावके उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुष्काळाचे सावट असताना प्रशासनाने परिस्थितीची गंभीर दखल घेऊन तातडीने पंचनामे करावेत, कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देण्यात आला.

Post a Comment

0 Comments