Ticker

6/recent/ticker-posts

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये


स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी मुंधडा यांचे आवाहन; जी. एच. रायसोनी विद्यापीठात महिला आरोग्य जागृती कार्यक्रम

अमरावती प्रतिनिधी अनिता यादव : घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी घेणारी महिला मात्र अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. दैनंदिन धावपळ, बदलती जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे “स्वतःची काळजी घेणे हीदेखील जबाबदारीच आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी मुंधडा यांनी केले.


जी. एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. विद्यापीठातील शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

यावेळी शारीरिक स्वच्छता, मासिक पाळीशी संबंधित समस्या व त्यांची लक्षणे, योग्य वेळी निदान, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, पीसीओडी तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. कोणतीही शारीरिक समस्या जाणवल्यास ती लपवून न ठेवता वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संतुलित आहार, योग आणि नियमित तपासणीवर भर

कामकाजी महिलांच्या बदललेल्या दिनक्रमामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र व्यस्त वेळापत्रकातूनही स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योगाभ्यास आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी या बाबी निरोगी जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवाव्यात, असा सल्ला डॉ. मुंधडा यांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते, तर विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांची विशेष उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. विनायक देशपांडे म्हणाले की, महिला ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहिली तरच संपूर्ण कुटुंबाची योग्य प्रकारे काळजी घेणे शक्य होते. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याशी संबंधित समस्या गांभीर्याने घेऊन आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या एचआर विभागाच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एचआर प्रमुख योगिता वंजारी यांनी केले.


Post a Comment

0 Comments