जी.एच. रायसोनी विद्यापीठात विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम; पर्यावरण संवर्धन, रक्तदान अन् समाजसेवेचा प्रभावी संदेश
अमरावती, प्रतिनिधी – अनिता यादव : जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एकाक्षरा’ गणेशोत्सवाने भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवून आणला. दहा दिवसांच्या या गणेशोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीने गणेशपूजन न करता पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकता आणि समाजसेवेचा संदेश विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिला.
विद्यापीठ परिसरात पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा जागर केला. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला.
‘मोदक बनवा’ स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी विभागाच्या वतीने ‘मोदक बनवा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रकारचे आकर्षक आणि नाविन्यपूर्ण मोदक सादर केले. चव, सादरीकरण आणि सर्जनशीलता या निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.
या स्पर्धेत मयंक विनोद डागामवार यांनी प्रथम, तर जान्हवी विलासराव सवाने यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. शेफ विक्रम अढाऊ यांनी परीक्षक व रिसोर्स पर्सन म्हणून भूमिका बजावली. शेफ सुयोग काटोले हे स्पर्धेचे समन्वयक होते. विभागाचे डीन डॉ. शैलेंद्र चिकटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या पाककला कौशल्यासोबतच आत्मविश्वास आणि संघभावनेलाही चालना मिळाली.
इको-फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मितीत विद्यार्थ्यांची सर्जनशीलता
पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विद्यापीठात इको-फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत श्रुती राऊत (बी.टेक. सिव्हिल) विजेती, तर कौस्तुभ बान (हॉटेल मॅनेजमेंट) प्रथम उपविजेता आणि प्रांजल जाधव (बी.टेक. सीएसई) द्वितीय उपविजेता ठरले.
याशिवाय भूमी सेंगर (बीएएलएलबी) आणि जान्हवी अवघाड (बी.फार्म) यांनीही सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेसोबतच पर्यावरणपूरक विचारांची प्रचिती या स्पर्धेतून आली.
५१ रक्तदात्यांनी दिला ‘रक्तदान महादान’चा संदेश
गणेशोत्सवाच्या सामाजिक उपक्रमांना जोड देत जागतिक फार्मसी दिनानिमित्त स्कूल ऑफ फार्मसी आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मेलघाट ब्लड सेंटर, परतवाडा यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात विद्यापीठातील ५१ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिराचे मार्गदर्शन स्कूल ऑफ फार्मसीचे डीन डॉ. नरेंद्र चंद्रा आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी कैलाश वाधवानी यांनी केले. विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून ‘रक्तदान हेच जीवनदान’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
‘विद्यार्थी हेच देशाचे भविष्य’ — कुलगुरू
विद्यार्थ्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करताना कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. उच्च शिक्षणासोबतच समाजाप्रती असलेली कर्तव्यभावना विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट आणि कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सामाजिक कार्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.
दहा दिवस चाललेल्या ‘एकाक्षरा’ गणेशोत्सवाचे यशस्वी संचालन क्रीडा अधिकारी डॉ. अमर मोरे यांनी केले
गणरायाच्या भक्तीतून पर्यावरण संवर्धनाचा ध्यास; रक्तदानातून समाजसेवेचा संदेश—‘एकाक्षरा’ गणेशोत्सव ठरला सामाजिक बांधिलकीचा जागर!
0 Comments