श्री वसंतराव नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रम
मंगरूळपीर सुधाकर चौधरी : स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे सचिव डॉ. अश्विन नाईक, डॉ. वर्षाताई नाईक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वडगुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रासेयोचे आराध्य दैवत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. वडगुले होते.
यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा क्षेत्रीय समन्वयक प्रा. डॉ. प्रमोद तायडे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट, सामाजिक बांधिलकी तसेच राष्ट्रनिर्माणातील स्वयंसेवकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
“राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस हा केवळ स्थापना दिवस नसून तरुणाईच्या ऊर्जेला समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि सामाजिक परिवर्तनासाठी वाहून घेण्याचा संकल्प दिवस आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जोपासून समाजातील विविध प्रश्नांच्या निराकरणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. प्रमोद तायडे यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. एस.एम. वडगुले यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजाशी आपले नाते अधिक दृढ करावे. सेवाभाव, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारी अंगीकारून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाला डॉ. एस.जी. ढाकुलकर, प्रा. डॉ. पी.डी. शृंगारे, ग्रंथपाल डॉ. डी.जी. राठोड, प्रा. डॉ. सुचिता माने, प्रा. डॉ. अय्याज शेख, प्रा. गोपाल चौधरी, प्रा. सुमित राठोड यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.कॉम. भाग-२ मधील विद्यार्थिनी कु. विनिता राऊत हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
0 Comments