Ticker

6/recent/ticker-posts

दुष्काळात हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया!

शहापूर जहागीरदार लेआउटमध्ये महिनाभरापासून फुटलेली जलवाहिनी; नळ योजना प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

नागरिक पाण्यासाठी वणवण फिरतात, अन् हजारो लिटर पाणी रस्त्यावर! जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई करणार का?

मंगरूळपीर : एकीकडे दुष्काळाच्या झळांनी नागरिक आणि शेतकरी हैराण झाले असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा अक्षरशः अपव्यय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार मंगरूळपीर शहरातील शहापूर येथील जहागीरदार लेआउट, अकोला रोड परिसरात समोर आला आहे. गेल्या एक महिन्यापासून नळ योजनेची पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटलेली असतानाही संबंधित प्रशासनाकडून अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

नळ योजनेतून पाणी सोडले जाते, त्यावेळी या फुटलेल्या पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एवढेच नव्हे तर पाण्याचा सतत होणारा प्रवाह परिसरात तलावासारखी परिस्थिती निर्माण करत आहे.

नागरिकांनी सांगितले; कर्मचारी पाहून गेले... दुरुस्ती मात्र अद्याप नाही!

या गंभीर प्रकाराची माहिती परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच तसेच संबंधित वार्ड प्रतिनिधींना दिली. त्यानंतर नळ योजनेच्या कर्मचाऱ्यांनाही याबाबत कळविण्यात आले. संबंधित कर्मचारी घटनास्थळी येऊन फुटलेली जलवाहिनी पाहून गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मात्र, पाहणी होऊनही महिनाभरात प्रत्यक्ष दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

संबंधित नळ योजनेच्या ठेकेदाराशीही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

एकीकडे पाण्यासाठी भटकंती; दुसरीकडे पिण्याचे पाणी रस्त्यावर!

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना नळ योजनेच्या निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जाणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पाणी बचतीचे आवाहन करणाऱ्या प्रशासनानेच जर स्वतःच्या यंत्रणेतील गळतीकडे दुर्लक्ष केले, तर नागरिकांनी पाणी वाचवायचे कसे? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी महोदय, जबाबदार कोण?

महिनाभरापासून जलवाहिनी फुटलेली आहे. संबंधित विभागाला माहिती आहे. कर्मचारी पाहणी करून गेले आहेत. ठेकेदाराशी संपर्क साधण्यात आला आहे. तरीही दुरुस्ती होत नसेल तर या विलंबाला जबाबदार कोण?

दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असताना संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून जिल्हाधिकारी, वाशिम यांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तसेच फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरुस्त करून पाण्याची गळती थांबवावी, परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि भविष्यात अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणेला स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा प्रत्येक वाया जाणारा थेंब आता नागरिकांच्या संतापाचा विषय बनला आहे. जिल्हाधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणार का, याकडे शहापूर परिसराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments