मंगरूळपीर ■ : शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना कायमस्वरुपी दिवसा वीज पुरवठा करण्याबाबतची मागणी किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष नाना देवळे यांच्या नेतृत्वाखाली उपकार्यकारी अभियंता, तहसीलदार व पोलीस निरीक्षक, मंगरूळपीर यांना निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनाचा आशय असा की,
राज्यात महावितरण कंपनी कडून कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर रात्री पहाटे वीज पंप चालू करण्यास जावे लागते. अशा परिस्थितीत लाईट नसल्यामुळे पेटीतील फ्युज टाकण्यास अडचणी येतात. कधी कधी पेटीत वीज प्रवाह उतरल्याचा धोका लक्षात येत नाही. तसेच अंधारामुळे साप, विंचू वगैरे पासून पेटीजवळ व रस्त्यावर सतत धोका होत असतो. तर कधी अंधारात वन्य प्राणी शेतकऱ्यांवर प्राण घातक हल्ला करतात व अशा प्राण घातक हल्याच्या देखील अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत.
नुकताच जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील पळासखेडे या गाव शिवारात कृषी पंपपेटी जवळ वीज प्रवाह उतरल्याने व अंधारात शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे एकाच दिवशी लागोपाठ जाधव कुटुंबातील तीन भावांचा शॉक लागून मृत्यू झाला व संपूर्ण कुटुंबच पोरके झालेले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे वरील जाधव बंधूंच्या मृत्यूस महावितरण कंपनी जबाबदार आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडून शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरू नये व त्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला जाऊ नये, म्हणून कृषी पंपांना तत्काळ दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन व्हावे.
तसेच रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मरचा फ्यूज गेल्यास रात्री वीज कंपनीचा कोणीही कर्मचारी उपलब्ध नसतो. त्यामुळे कृषी पंपांना रात्रीचा वीज पुरवठा नीट मिळत नाही. त्यामुळे कृषी पंपाना दिवसाच वीज पुरवठा होईल असेच नियोजन करावे. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यास ४८ तासाच्या आत दुरुस्ती किंवा बदलण्याची देखील व्यवस्था करावी, अन्यथा शेतकऱ्यांना यापुढे महावितरण कंपनीच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन करणे भाग पडेल, अशा विविध मागण्यांचे निवेदन किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष नाना देवळे,श्रीकांत गावंडे,गणेश रोकडे,गंगाराम खंडरे,लक्ष्मण व्यवहारे,अमर भगत,समर्थ भगत, वसंता मोरे तसेच काही शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
★★★★★★★★★★★



0 Comments