वाशिम : केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा व देशाच्या काना कोपऱ्यातुन लाखो शेतकरी ऐन कडाक्याच्या थंडीत मागील अकरा दिवसांपासून आंदोलन करीत आहेत.परंतु, केंद्र सरकार शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकर्यांच्या वतीने उद्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंद ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा असून जगाचा पोशिंदा जगला पाहिजे तरच देश जगेल म्हणून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी उद्याचा भारत बंदला यशस्वी करण्यासाठी व व्यापाऱ्यांनी देखील या बंदला पाठिंबा देण्यासाठी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावी. ७/१२ वर मालक म्हणून रहायचे असेल तर उद्याच्या ८/१२ च्या भारत बंद मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो.
आपला देश कृषिप्रधान देश आहे शेतकरी शेतामध्ये राबराब राबून अन्न पिकवतो व त्यामुळेच आपण आपण आहोत, केंद्र सरकारने संख्याबळाच्या जोरावर शेतकरीविरोधी तीन कृषी कायदे केले. परंतु हे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्यामुळे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हे तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब,हरियाणासह देशाच्या कानाकोपर्यातून शेतकरी मागील अकरा दिवसांपासून राजधानीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत.यामध्ये लहान मुले, वयोवृद्ध शेतकरी लढा देत आहेत. ही बाब खेदजनक आहे. संपूर्ण देशातून शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी होत असतानाही केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे. शेतकऱ्याकडे शेती शिवाय उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसून वावर आहे तरच पावर आहे, म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्याच्या भारत बंदला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देण्यासाठी सहभागी व्हावे, व जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी देखील पाठिंबा देण्याकरिता आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून शेतकऱ्याचे दुःख समजून घ्यावे,शेतकऱ्यांना सात-बारावर नाव हवे असेल तर आठ बाराच्या संपात सर्वांनी सहभागी व्हावे.
चंद्रकांत ठाकरे
अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम तथा
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाशिम
0 Comments