Ticker

6/recent/ticker-posts

एसटी महामंडळास एक हजार कोटी अर्थसहाय्य

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

   
-------------------------------------------------------------------

 ◆ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

एसटीच्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२० अखेरचे वेतन देण्यासाठी गेल्या महिन्यात १२० कोटी रुपयांचा निधी आकस्मिकता निधीमधून अग्रीम (अ‍ॅडव्हान्स) म्हणून मंजूर करण्यात आला होता. ही अग्रीम  रक्कम वजा करून उर्वरित ८८० कोटी रुपये ६ मासिक हप्त्यांमध्ये एसटी महामंडळास अदा करण्यात येतील. नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या महिन्यांच्या वेतनासाठी प्रति महिना १५० कोटी या प्रमाणे व एप्रिल २०२१ च्या वेतनासाठी १३० कोटी रुपये असे या निधीचे स्वरूप आहे. ही रक्कम हिवाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणी म्हणून मंजूर करण्यात येईल.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची संख्या ९९ हजार ७८७ एवढी असून विविध प्रवासी वर्गाला प्रवास भाडय़ात सवलतीपोटी शासनाकडून महामंडळास १७०० कोटी रुपये देण्यात येतात. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी ४० टक्के खर्च कर्मचाऱ्यांवर आणि ३२ टक्के खर्च इंधनावर होतो. २३ मार्च पासून कोरोनामुळे टाळेबंदी झाल्याने एसटी महामंडळाची वाहतूक सेवा अत्यावश्यक सेवा वगळता बंद पडल्याने उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होऊन कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले होते. अद्यापही जनतेच्या मनात असलेल्या भितीमुळे प्रवासी संख्या मर्यादितच आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला होणारा तोटा लक्षात घेऊन हे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे

Post a Comment

0 Comments